09 December 2019

News Flash

मृतसाठाही संपण्याच्या मार्गावर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जिवंत साठय़ाची क्षमता १०१७ दशलक्ष घन मीटर आहे.

पाऊस लांबल्यास परिस्थिती गंभीर होणार

नागपूर : नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धारणातील मृतसाठाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढच्या काळात पाऊस न आल्यास शहरात भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००३-०४साली अशी स्थिती उद्भवली होती. मात्र, तेव्हा वेळेत पाऊस आल्याने संकट टळले. परंतु यंदा तोतलाडोह धरणाच्या मृतसाठय़ात उपलब्ध पाण्यातून केवळ ४० दलघमी पाणी वापरता येणार आहे.  शासनाने आणि महापालिकेने वर्षभरात पाण्याच्या नियोजनासाठी कोणतीच ठोस पावले न उचलल्याने मुंबईनंतर आता नागपूरवरही पाणी कपातीची नामुष्की ओढवली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जिवंत साठय़ाची क्षमता १०१७ दशलक्ष घन मीटर आहे. त्यापैकी १५० दलघमीपासून खाली मृतसाठा सुरू होतो. एकूण मृतसाठय़ातून केवळ १०० दलघमी पाणी वापरण्यायोग्य असते. गेल्या एक महिन्यापासून शहराची तहान मृतसाठय़ातून भागवली जात आहे. त्यामुळे मृतसाठय़ाची पातळी कमालीची खालवत जात होती. शिवाय यंदा पाऊस हवा तसा पडला नसल्याने शहराला गेल्या तीन आठवडय़ापासून मृतसाठय़ातूनच पाणीपुरवठा सुरू होता आणि पाण्याची पातळी खालवत जात होती. आता मृतसाठय़ात ११० दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी ४० दलघमी पाणी अजून पुढील काही दिवस वापरता येऊ शकते.  २००३-०४साली देखील मृतसाठय़ाने आतापेक्षाही अधिक पातळी गाठली होती. मात्र वेळेत पाऊस पडल्याने संकट टळले होते. मात्र यंदा पुढील काही दिवस पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसून मृतसाठय़ातूण पुढील ६० दिवस पाणीपुरवठा करता येईल येवढेच पाणी शिल्लक आहे.

दररोज ६५० द.ल.लिटर पुरवठा

शहराला दररोज ६५० दल लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. मृत साठा साधारत: १५ टक्के पाणीसाठा राखीव असतो. धरणाच्या तळाशी असलेला पाण्याचा साठा गुरुत्वाकर्षणशक्तीने पुढे जात नाही. पंप लावून हा पाणीसाठा उपसावा लागतो. सुरक्षित जलसाठा म्हणून हा जलसाठा ओळखला जातो. शक्यतो या पाणीसाठय़ाला हात लावला जात नसतो. २००६ नंतर प्रथमच अशी वेळ आली आहेम्  दरम्यान साठय़ामधून  ३० एमएमक्यूब पाणी उचलण्याची परवानगी महापालिकेला मिळाली होती. यातून शहराला दररोज १.२६ एमएमक्यूब (घनमिटर)पाणी  मिळत होते. ते आता बंद होईल. त्यामुळे अडचण आली आहे.

व्हीआयडीसीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला होता. जलसाठय़ांची स्थिती बघता विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) पाणी जपून वापरण्याचे आणि पाणी कपातीची सूचना महापालिकेला केली होती. परंतु एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

उत्तर, पूर्व नागपूरच्या काही भागात पाणी

कन्हान नदीवरील जलशुद्धी केंद्रातून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या भागात नियमित पाणीपुरवठा केला जाईल. कन्हान नदी विहीर खोदण्यात आली आहे. त्यातून दररोज पाण्याची उचल केली जाते. तेथे अजूनही पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पूर्व आणि उत्तर नागपुरात बहुतांश भागाला थोडय़ाफार प्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल. नागपुरातील आशीनगर, लकडगंज, सतरंजीपुरा आणि नेहरूनगर झोनमध्ये येणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा नियमित केला जाणार आहे.

‘‘नवेगाव खैरी, तोतलाडोह धरणाची पातळणी आणि कन्हान नदी पात्रातील पाण्याची उपलब्धता बघून पूढील आठवडय़ात निर्णय घेण्यात येईल. येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक होईल. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काट-कसरीने करावा.

-विजय झलके, सभापती, जलप्रदाय समिती, महापालिका.

First Published on July 16, 2019 2:26 am

Web Title: nagpur district face severe water crisis due to shortage of rainfall zws 70
Just Now!
X