जिल्ह्य़ात करोना पुन्हा गंभीर वळणावर

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात असून बुधवारी दैनिक रुग्णसंख्येचा गेल्या ७४ दिवसांतील उच्चांक नोंदवला गेला. बुधवारी दिवसभरात जिल्ह्य़ात ५ रुग्णांचा मृत्यू तर ५९६ नवीन रुग्णांची भर पडली. येथील विविध रुग्णालयांत अत्यवस्थ  रुग्णांची संख्याही वाढून ९५३ रुग्णांवर पोहचली.

जिल्ह्य़ात ५ डिसेंबर २०२० रोजी ५२७ करोनाबाधित आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या १५० ते ४००च्या घरात होती. परंतु फेब्रुवारीपासून रोजची रुग्णसंख्या ३८० ते ५३५ दरम्यान  आहे. १६ फेब्रुवारीला जिल्ह्य़ात ५३५ रुग्ण आढळले. परंतु दुसऱ्याच दिवशी बुधवारी  शहरात ४९९, ग्रामीण भागात ९५, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ५९६ रुग्ण नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ९१५, ग्रामीण २७,५५५, जिल्ह्य़ाबाहेरील ९१४ अशी एकूण १ लाख ४० हजार ३८४ रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात शहरात १, ग्रामीणला २, जिल्ह्य़ाबाहेरील २ असे एकूण ५ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांची मृत्यूसंख्या २ हजार ७५४, ग्रामीण ७६१, जिल्ह्य़ाबाहेरील ७३२ अशी एकूण ४,२४७ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात २२८, ग्रामीण ५१ असे एकूण २७९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ५ हजार २३६, ग्रामीण २६,१८४ अशी एकूण १ लाख ३१ हजार ४२० व्यक्तींवर पोहोचली आहे.  सक्रिय बाधितांची संख्याही वाढली आहे. बुधवारी शहरात ३ हजार ९२५, ग्रामीण ७९२ अशी एकूण ४ हजार ७१७ सक्रिय रुग्ण होते.  गंभीर संवर्गातील रुग्णांची संख्या वाढून ९५३ रुग्ण झाली आहे. गृह विलगीकरणात ३ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान,  बुधवारी शहरात ५,३३२, ग्रामीणला २,२३५ अशा एकूण ७,५६७ चाचण्या झाल्या. हाही गेल्या काही महिन्यातील नवीन उच्चांक आहे.

खुनाच्या आरोपीला करोना

पत्नीची हत्या केल्याप्रकरणात अटकेतील पतीला करोना झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ललित व त्याची पत्नी ज्योती ही पारडीतील मॉ उमिया इण्डस्ट्रीयल एरिया भागात राहायचे. ज्योतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय ललितला होता. मंगळवारी पहाटे ललित याने काठीने डोक्यावर वार करून ज्योतीची हत्या केली व फरार झाला. उमरेड मार्गावर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने ललित याला अटक केली. त्याला पारडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पारडी पोलिसांनी ललित याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला मयो रुग्णालयात दाखल केले.

लसीकरणानंतर ८ जणांना बाधा

गेल्या आठ दिवसांत लस घेतल्यावरही सुमारे ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची धक्कादायक माहिती आहे. यापैकी २ डॉक्टर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील, २ डॉक्टर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील तर इतर आरोग्य कर्मचारी मेडिकल, मेयोतील आहेत. इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टर बाधितांच्या सेवेतच होते. एवढे रुग्ण आढळण्याच्या वृत्ताला महापालिकेतील डॉ. संजय चिलकर यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु लसीकरण आणि करोनाची बाधा होण्याचा काहीही संबंध नसून करोना विरोधात लढण्याची प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) विकसित होण्याला किमान दोन लसीनंतरही काही दिवस लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दंतमध्ये पुन्हा १० जणांना करोना

शासकीय दंत महाविद्यालयात करोनाचा विळखा कायम असून येथील आणखी १० जणांना  लागण झाली. त्यात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह इतरांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या २३ रुग्णांवर पोहोचली आहे.