‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ची शुक्रवारी विभागीय अंतिम फेरी; मकरंद अनासपुरे परीक्षक 

‘लोकसत्ता’ आयोजित वक्ता दशसहस्रेषु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी येत्या १० फेब्रुवारीला होत असून यावेळी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे लाभले आहेत. प्राथमिक फेरीत निवड करण्यात आलेल्या १६ विद्यार्थ्यांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून विनोबा विचार केंद्रात दुपारी १ वाजता वक्तृत्व स्पर्धेस सुरुवात होईल.

‘लोकसत्ता’ आयोजित आणि वीणा वर्ल्ड प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बँक ऑफ महाराष्ट्र, दि विश्वेश्वर को-ऑप. बँक लिमिटेड, इन्स्टिटय़ुट ऑफ करिअर डेव्हलपमेंट, औरंगाबाद (आयसीडी) आणि ‘एमआयटी’ (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू असून येत्या १० फेब्रुवारीला विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारीला होणार आहे.

प्राथमिक फेरीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या अपुऱ्या पाठबळाबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूर आणि नागपूरबाहेरच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे होते. शहरात काही महाविद्यालये विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी नावे देतात. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांवर कलेच्या अंगाने संस्कार करण्याचे किंवा विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता देण्याची तसदी घेत नाहीत. जे काही करायचे ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर करायचे. नागपूरबाहेरच्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांसह प्रवासाच्या सोयी, स्पर्धेसंबंधीचे योग्य मार्गदर्शन, नागपूपर्यंत येण्याचे वाहन आणि आर्थिक प्रश्न, शिवाय, मुक्काम करावा लागला, तर त्यासाठीची तजवीज, हे प्रश्न भेडसावतात. त्यामुळे बरेच विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतच नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मात्र, त्याचबरोबर लोकसत्ताने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठामुळे आम्ही आमच्या महाविद्यालयांमध्ये या स्पर्धेची जाहिरात करून विद्यार्थ्यांना ही कला अवगत करून देत असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले की, त्याची छायाचित्रे काढून प्रसिद्ध केली जातात. मात्र, त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. हे जरी खरे असले तरी काही महाविद्यालयांमध्ये कलासंस्कार गांभीर्याने केला जात असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला

‘लोकसत्ता’ची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असल्याने तिला एक प्रतिष्ठा आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवण्यापूर्वी आम्ही काही गृहपाठ करून घेतला. कारण, विद्यार्थी वर्गापर्यंतच सीमित असतात. अभ्यास, परीक्षा आणि गुण या पलीकडेही विद्यार्थ्यांना खुणावणारे जग आहे. बाहेरच्या स्पर्धामध्ये भाग घेणे, व्यासपीठावर जाऊन बोलण्यातून आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी जे विषय दिले होते त्या विषयीचा त्यांचा अभ्यास जाणून घेतला आणि काही टिपणे काढायला सांगितले. विद्यार्थ्यांनी ते केले देखील. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही वक्ता दशसहस्रेषूसाठी पाठवले.

डॉ. अमर बोंदरे, सांस्कृतिक समन्वयक, व्हीएमव्ही कॉलेज

विद्यार्थ्यांना नियमित प्रोत्साहन देतो

इंडियन एक्स्प्रेस व लोकसत्ता प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आहेत. वक्तृत्व स्पर्धेच्या तीन-चार दिवसांपूर्वी आम्हाला कळले. स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा असो की, बारामतीची शरद पवार सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा असो, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींची कामगिरी सरस ठरली. त्यामुळेच रूपाली वाहिले आणि सुचित्रा चौहान या विद्यार्थिनींना पाठवले. लोकसत्ताने आयोजित केलेल्या प्राथमिक फेरीत फारच छान व्यवस्था असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले. ‘भाषिक कौशल्यविकास’ हा कार्यक्रम दर शनिवारी महाविद्यालयात आयोजित करण्यात येतो. त्यात विद्यार्थ्यांना एक विषय देऊन बोलते केले जाते. आमचे गाव म्हणजे मराठवाडय़ाच्या सीमेपासून अगदी १० किलोमीटरवर अगदी बुलढाण्याचा शेवटच. मात्र, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धासाठी आम्ही नियमित प्रोत्साहन देतो.

– डॉ. एम. आर. थोरवे,  प्राचार्य, देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय