सर्वाधिक ७५ टक्के पदे गोंदियातील; ‘डॉक्टर्स डे’ विशेष

नागपूर : करोनाच्या कठीण काळात पूर्व विदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनीही पूर्ण क्षमतेने आरोग्य सेवा दिली. त्यात बऱ्याच डॉक्टरांना करोना होऊन काहींची प्रकृती गंभीरही झाली. येथे करोनाच्या उद्रेकामुळे डॉक्टरांचा अभाव जाणवला. हा ताजा अनुभव असतानाही नागपूर विभागात आजही विशेषज्ञ डॉक्टरांची तब्बल ५२ टक्के पदे रिक्त असल्याचे पुढे आले आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या सहा जिल्ह्य़ांत विशेषज्ज्ञ डॉक्टरांची एकूण २६० पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल १३६ पदे रिक्त असून केवळ १२४ डॉक्टरांच्या बळावर  सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच विदर्भातील सर्वात मागासलेला जिल्हा असलेल्या गडचिरोलीत विशेषज्ज्ञांची ४१ पदे मंजूर आहेत. त्यातील २१ पदे भरली असून ४९ टक्के म्हणजेच २० पदे रिक्त आहेत. गोंदियात विशेषज्ज्ञांची ४० पदे मंजूर असून केवळ १० भरलेली आहेत.  ७५ टक्के म्हणजे तब्बल ३० पदे रिक्त असल्याने या स्थितीत गंभीर रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळणार कशा, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपुरात ६४ पदे मंजूर आहेत. त्यातील ४१ भरलेली असून २३ म्हणजे ३६ टक्के पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्य़ात ३७ पदे मंजूर असून त्यातील १९ भरलेली  तर ४९ टक्के म्हणजे १८ पदे रिक्त आहेत. वर्धा जिल्ह्य़ात ३४ पदे मंजूर असून त्यातील १७ भरलेली तर १७ म्हणजे तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ात ४४ पदे मंजूर आहेत. त्यातील १६ भरलेली असून २८ म्हणजेच तब्बल ६४ टक्के पदे रिक्त आहेत.

क्षमतेपलीकडे जाऊन व्यवस्थापन

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गंभीर करोनाग्रस्तांवर उपचारासाठी मेडिकल, मेयोत तातडीने सुविधा उभारण्यात मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांची भूमिका महत्त्वाची होती. रुग्णसंख्या वाढल्यावर खाटा वाढवण्यासह इतर यंत्रणा उभारण्यातही यांची महत्त्वाची भूमिका बजावली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ. सजल मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी आली. त्यांनीही पूर्ण क्षमतेने येथील खाटांची संख्या ६०० वरून ९०० पर्यंत नेली.  येथील स्वच्छतेसह जीवनरक्षण प्रणालीची संख्या वाढवण्यासह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर झटपट अद्ययावत उपचार उपलब्ध करण्यातही डॉ. गुप्ता यांची भूमिका महत्त्वाची होती.

मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटीतही पदे रिक्तच

मध्य भारतातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याचे प्रमुख केंद्र असलेल्या  मेडिकल रुग्णालयात वर्ग एकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची दीडशेच्या जवळपास पदे मंजूर असून त्यातील २५ टक्के पदे रिक्त आहेत. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात २४ पदे मंजूर असून त्यातील ३० टक्के तर मेयो रुग्णालयात वर्ग एकच्या तज्ज्ञांची ५० पदे मंजूर असून त्यातील २० टक्के पदे रिक्त आहेत. या टर्शरी केअर दर्जाच्या रुग्णालयांपैकी मेडिकल, मेयो रुग्णालयात गंभीर  करोनाग्रस्तांवर उपचार केले जातात. या स्थितीतही येथे मोठय़ा संख्येने रिक्त पदे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच वैद्यकीय शिक्षण खात्याकडून येथे पदे भरली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.