News Flash

संतोष आंबेकरचा आलिशान बंगला झोपडपट्टीचा भाग

आंबेकरने प्रसारमाध्यमे व किरकोळ गुंडांचा वापर करून लोकांकडून मोठय़ा प्रमाणात खंडणी वसूल केली आहे.

घर रिकामे करण्याच्या नोटीसला आव्हान; कारवाईपूर्वी प्राधिकरणात सुनावणी होणार 

नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा इतवारी परिसरातील आलिशान बंगला झोपडपट्टी परिसरात मोडत असून चोवीस तासात घर रिकामे करण्याच्या महापालिकेच्या नोटीसला त्याने आव्हान दिले आहे. या नोटीशीवर झोपडपट्टी प्राधिकरणात सुनावणी होणार असून अंतिम निर्णयानंतरच योग्य ती कारवाई होणार असल्याने आंबेकरला तूर्तास दिलासा मिळाला आहे.

आंबेकरने प्रसारमाध्यमे व किरकोळ गुंडांचा वापर करून लोकांकडून मोठय़ा प्रमाणात खंडणी वसूल केली आहे. अनेक खुनाच्या गुन्ह्यंमध्ये तो आरोपी होता. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत पाचदा मोक्का लागला आहे. त्यानंतरही तो समाजात उजळ माथ्याने वावरत होता व लोकांना धमकावत असल्याचा प्रकार समोर आला. बंदुकीच्या जोरावर त्याने शेकडो कोटींचे साम्राज्य तयार केले. गुजरातचा व्यापारी जिगर पटेल यांना त्याने पाच कोटींनी गंडवल्याने त्याच्या काळ्या साम्राज्याचा शेवट सुरू झाला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर घट्ट फास आवळला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध आतापर्यंत खंडणी मागणे, धमकी देणे, अवैध सावकारी, बलात्कार  आदी स्वरूपाचे आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

दुसरीकडे पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा लेखाजोखा तयार केला. त्यावेळी आंबेकरने आपल्या घराच्या आजूबाजूला असलेले पाच भूखंड बळकावून आलिशान बंगला बांधला. या बंगल्यावर कारवाई करून बांधकाम पाडण्यात यावे, अशी विनंती पोलिसांनी महापालिकेला केली. त्यानंतर महापालिकेने १३ नोव्हेंबरला आंबेकरच्या घरावर नोटीस चिटकवून घराचे बांधकाम अनधिकृत असल्याने २४ तासांमध्ये ते पाडण्यात यावे.

अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले. पण, आंबेकरचा बंगला झोपडपट्टी परिसरात असून महापालिकेच्या संभाव्य कारवाईविरुद्ध आंबेकरच्या वकिलांनी झोपडपट्टी प्राधिकरणात आव्हान दिले आहे.

आंबेकरचे घर असलेला परिसर झोपडपट्टी भागात मोडतो. त्यामुळे त्याच्या वकिलांनी बांधकाम पाडण्याच्या नोटीशीला आव्हान दिले असून त्यावर लवकरच सुनावणी देण्यात येईल. सुनावणी झाल्यानंतर झोपडपट्टी प्राधिकरण आपला निर्णय देईल. प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचे अधिकारही त्याला आहेत.

– आर.जी. रहाटे, कार्यकारी अभियंता, सक्षम व झोपडपट्टी प्राधिकरण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 2:47 am

Web Title: nagpur don santosh ambekar bungalow in slum area zws 70
Next Stories
1 अयोध्याप्रकरणी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वकिलावर गुन्हा
2 ‘हर्बल’च्या नावाखाली हुक्का पार्लरचा गोरखधंदा
3 आपसातील वादामुळे दोघांचेही नुकसान
Just Now!
X