News Flash

अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच महापालिका शाळेचे वावडे!

कर्मचाऱ्यांची केवळ २७ मुले महापालिकेच्या शाळेत

कर्मचाऱ्यांची केवळ २७ मुले महापालिकेच्या शाळेत

महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी इतर पालकांना आवाहन करीत असले तरी त्यांचीच मुले या शाळेत शिकत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.  महापालिकेतील केवळ २७ कर्मचाऱ्यांची मुले महापालिका शाळेत शिक्षण घेत असून त्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचा समावेश जास्त असल्याची माहिती आहे.

स्मार्ट सिटी म्हणून शहर विकसित करण्यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असताना दुसरीकडे शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे महापालिका प्रशासनाचे आणि पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट झाली आहे.

एकही विद्यार्थी शिक्षण विना राहू नये, यासाठी दरवर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे उन्हाळ्याच्या सुटीत विविध भागातील झोपडपट्टींमध्ये शिक्षकांना पाठवले जाते. ते तिथे महापालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन करतात. मात्र नुकतेच महापालिकेतील मुख्य कार्यालयात आणि दहाही झोनमध्ये प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ २७ मुले ही महापालिकेतील कर्मचाऱ्यांची असल्याचे समोर आली आहे. त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची २१ मुले आणि अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आहे. महापालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांची मुले महागडे शिक्षण देणाऱ्या खासगी शाळेत आणि काहींची शहरातील नामांकित शाळांमध्ये शिकत आहेत.

हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली असली तरी यावेळी मात्र वाढेल, असा विश्वास आहे. अजूनही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेतील बहुतेक कर्मचाऱ्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. शिवाय पाल्याला कुठल्या शाळेत टाकावे, हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.  – दिलीप दिवे, शिक्षण सभापती, महापालिका

२२ शाळांमध्ये शंभरही विद्यार्थी नाहीत

शहरात महापालिकेच्या एकूण १५८ शाळा आहेत. त्यापैकी २२ शाळांना विद्यार्थ्यांचे शतकही गाठता आले नाही. रस्ते, दळणवळणाची साधने, उद्योग उभारणी यातून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करणारे सत्ताधारी गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देण्याकडे कायम दुर्लक्ष करीत आले आहेत. महापालिकेच्या ३४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 12:25 am

Web Title: nagpur education in bad condition
Next Stories
1 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात व्यवसाय करायचा आहे का?
2 तब्बल तीनवर्षांनंतर शहरात तणमोर दर्शन
3 अधिकाऱ्यांचा ‘सनदी’ पक्षपात!
Just Now!
X