भाचे, मुलगे, बहीण, सून, पत्नी उमेदवार

काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपने त्यांच्याच पक्षातील नेत्यांच्या अनेक नातेवाईकांना उमेदवारी देऊन काँग्रेसची परंपरा पुढे नेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही त्याची जुनी परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निवडणुकीत नेत्यांचे लक्ष पक्षाच्या प्रचाराऐवजी नातेवाईकांना जिंकून आणण्यातच अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या निवडणुकीत भाजप व काँग्रेसने उमेदवारी देताना पक्षाच्या सामान्य कार्यकर्ता यासोबतच नेत्यांचे नातेवाईक हा सुद्धा महत्त्वाचा निकष ग्राह्य़ धरला. त्यामुळे नेत्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, भाचे, मंत्र्यांच्या स्वीय सचिवांचे बंधू, नेत्यांच्या सुना रिंगणात उतरल्या आहेत. घराणेशाहीवर भाजप सातत्याने टीका करीत आला आहे. मात्र, यावेळी निवडणुकीत उमेदवारी देताना या पक्षाने काँग्रेसलाही मागे टाकले आहे. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या बंधूला भाजपने संधी दिली आहे. एका आमदाराने दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर तिसऱ्यांदा उमेदवारी देतानाही कार्यकर्त्यांऐवजी घरातच उमेदवारी मिळविली आहे. भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रवीण भिसीकर आणि त्यांची बहीण विद्यमान नगरसेविका यशश्री नंदनवार हे दोघेही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा नातेसंबंधावरही परिणाम झाला आहे. बहिणीला भाजपकडून तर तिच्या वहिनीला काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचाही प्रकार प्रभाग क्रमांक ३६ मध्ये झाला आहे. भाजपच्या विद्यमान नगरसेविका पल्लवी पन्नासे-श्यामकुळे यांच्या विरुद्ध त्यांच्या भावाच्या पत्नी प्रज्ञा पन्नासे (काँग्रेस) रिंगणात आहेत. काँग्रेसची तर परंपराच घराणेशाहीची असल्याने त्यांनी ती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचे प्रमाण भाजपच्या तुलनेत कमी आहे. माजी नगरसेवक मनोज साबळे यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका अर्चना साबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवराव देवगडे यांचा मुलगा शंकरराव देवगडे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांचा मुलगा तौसीफ अहमद अब्दुल रिंगणात आहेत.

गडकरींना त्यांच्याच वक्तव्याचा विसर

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते, प्रत्यक्ष भाजपच्या यादीत नेत्यांच्या नातेवाईकांचा भरणा अधिक आहे आणि ही यादी गडकरी यांनीच अंतिम केली आहे. त्यामुळे गडकरी यांना त्यांच्याच वक्तव्याचा विसर पडला होता का? असा सवाल आता नाराज भाजप कार्यकर्ते करू लागले आहेत.

भाजप

  • रूपा राय – माजी राज्यपाल डॉ. रजनी रॉय यांच्या सून
  • दिलीप दिवे – सुधीर दिवे यांचे बंधू
  • परिमिता फुके – आमदार परिणय फुके यांची पत्नी
  • विक्की कुकरेजा – घनश्यामदास कुकरेजा यांचा मुलगा
  • पल्लवी शामकुळे – आमदार नाना शामकुळे यांची सून
  • अविनाश ठाकरे – माजी आमदार अशोक मानकर यांचा भाचा
  • डॉ. रवींद्र भोयर – डॉ. विलास डांगरे यांचा भाचा
  • विशाखा बांते – माजी नगरसेवक बाळू बांते यांच्या पत्नी
  • लक्ष्मी यादव – नगरसेवक मुन्ना यादव यांच्या पत्नी

काँग्रेस

  • तौसीफ अहमद अब्दुल – माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन यांचा मुलगा
  • बंटी शेळके – बाबा शेळके यांचा मुलगा
  • हर्षला साबळे – माजी नगरसेवक हर्षला साबळे यांच्या पत्नी
  • कमलेश चौधरी – माजी नगरसेवक दिलीप चौधरी यांचा मुलगा
  • शंकरराव देवगडे – माजी आमदार यादवराव देवगडे यांचा मुलगा
  • प्रज्ञा पन्नासे – काँग्रेस नेते मुकुंदराव पन्नासे यांची सून