तीन पक्षांचे कक्ष रिकामे

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. मुस्लिम लिग, मनसे, भारिप या राजकीय पक्षांचा मात्र एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे त्यांना देण्यात आलेले कक्ष रिकामे करावे लागणार आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून लवकरच संबंधित राजकीय प्रशासनाकडून पत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य असल्यामुळे या राजकीय पक्षांना स्वतंत्र कक्ष द्यावा की नाही याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू झाला आहे. दरम्यान, भाजपसह अन्य पक्षातून निवडून आलेल्या महिला सदस्यांची संख्या (८१) बघता त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यासंदर्भात प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे.

१५१ सदस्य असलेल्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे १०८ तर काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी १ या प्रमाणे सदस्य निवडून आले. महापालिकेत प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे गेल्या दहा वर्षांत त्यांना महापालिका प्रशासनाकडून कक्ष देण्यात आले होते. २०१२ च्या निवडणुकीत भाजप ६२ अपक्ष १०, मुस्लिम लिग २, बरिएमं १, भारिप २, लोकमंच १, काँग्रेस  ४१, बसपा १२ राष्ट्रवादी काँग्रेस ६, शिवसेना ६ मनसे २ असे १४५ सदस्य होते. प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने त्यांना महापालिकेमध्ये कक्ष निर्माण करून देण्यात आले असताना त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सर्व सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी मुस्लिम लिग, मनसे, भारिप, लोकमंच या राजकीय पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, त्यामुळे या राजकीय पक्षांना देण्यात आलेले कक्ष त्यांनी रिकामे करावे, असे निर्देश लवकरच प्रशासनाकडून दिले जाणार असून त्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे.

महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर या सर्व घडामोडी होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेत यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे आणि अपक्ष उमेदवार आभा पांडे यांनी पुन्हा महापालिकेत प्रवेश केला आहे. मात्र,  केवळ एका सदस्यांसाठी कक्ष निर्माण करून द्यावा की नाही याबाबत प्रशासनात विचार सुरू आहे.

शिवसेनेचे ६ सदस्य होते, मात्र, आता केवळ २ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचा कक्ष कायम राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेत भाजपचे संख्याबळ आणि त्यातही महिला सदस्यांची संख्या बघता सत्ता पक्षाच्या कक्षामध्ये जागेची कमतरता निर्माण होऊ शकते. महापालिकेत महिलांसाठी स्वतंत्र कक्ष व्हावा या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहे. मुस्लिम लिगसाठी देण्यात आला कक्ष हा महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तापक्ष नेत्यांचे स्वतंत्र कक्ष असून त्यांच्या कक्षाची आणि ‘अ‍ॅन्टी चेंबरची’ रंगरंगोटी आणि डागडूजी करीत नूतनीकरण केले असताना विरोधी पक्ष नेत्यांचा कक्ष मात्र, जैसे थे आहे. कक्षात असलेले जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत नवे साहित्य आणले जात आहे. ५ मार्चला महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया असूून ६ मार्चला पदग्रहण समारंभ आहे. त्याचवेळी स्थायी समिती आणि सत्तापक्ष नेत्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. त्यामुळे चारही कक्ष सुसज्ज करण्यासाठी दिवस रात्र काम सुरू झाले आहे. एकीकडे महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकेकडे पैसा नसताना दुसरीकडे मात्र ,या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कक्षांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. महापालिकेत भाजपची संख्या बघता आणि सत्तापक्षाच्या कार्यालयात बैठक होत असल्यामुळे या कक्षातील अ‍ॅन्टी चेंबर काढून टाकण्यात आले असून हा कक्ष वाढविण्यात येत आहे.