मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उमेदवाराची क्लृप्ती; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

महानगरपालिका निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करून मते पदरी पाडून घेण्यासाठी उमेदवारांकडून विविध घोषणा केल्या जात असताना सक्करदरा परिसरात एका भाजपच्या उमेदवाराकडून मतदारांना कुपनचे वाटप करण्यात आले. या कुपनवर पैसे मिळणार असल्याची जोरदार चर्चा परिसरात असून मात्र, वाटणाऱ्यांकडून ते कार्यकर्त्यांना अल्पोपहाराकरिता देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रभाग-३१ मधून भाजपकडून उपमहापौर सतीश होले रिंगणात आहेत. शनिवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आनंदनगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ जवळपास चारशे ते पाचशे महिला गोळा झाल्या होत्या. त्या ठिकाणी सतीश होले यांचा मुलगा अक्षय आणि त्यांच्या साथीदारांकडून महिलांना ‘सबका मालीक एक’ असे लिहिलेले आणि साईबाबा यांची प्रतिमा असलेले छापलेले कुपन वितरित करण्यात येत होते. नंतर हे कूपन जमा केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात पैसे मिळत असल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस आनंद नेर्लेकर आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी तेथे जवळपास ४०० ते ५०० महिला होत्या. अक्षय आणि त्याचे साथीदार महिलांना कुपन देत होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सर्व महिला या कार्यकर्त्यां असून त्या प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांना नाश्ता करण्यासाठी कुपन देण्यात येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी काही कुपनं ताब्यात घेतली. त्यानंतर अक्षय होले यांना कार्यकर्त्यांकरिता असलेल्या नाश्त्याची व्यवस्था कुठे आहे, याची चौकशी केली. त्यांनी रेशीमबाग येथील एक जागा सांगितली. त्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली असता तेथे कोणत्याही नाश्त्याची व्यवस्था नव्हती. त्यानंतर पोलिसांनी भादंविच्या १७१ (ई) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

विविध प्रकारची कुपनं

प्रचारादरम्यान लोकांना विविध रंगाचे आणि वेगवेगळी नावे नमूद असलेल्या कुपनचे वितरित करण्यात आले. दिवसभर प्रचार रॅलीत फिरणाऱ्यांना कुपन देण्यात येत आणि त्यानंतर ते कुपन जमा करणाऱ्यांना पैसे देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवडणुकीत पैसे वितरित करण्यास मनाई असून अशाप्रकारच्या क्लृप्त्या करून मतदारांना आकर्षित करण्यात येते. त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन होले यांना स्पष्टीकरण मागणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले.

निवडणुकीच्या वादातून हल्ला, एक जखमी

निवडणुकीच्या वादातून दोन गट समोरासमोर आले आणि एकमेकांवर हल्ला केला. यात एका युवकाच्या पाठीत चाकू खुपसला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या वादानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले असता त्यांना रस्त्यावर एक पिस्तूल सापडले. आसिफ शेख मोहम्मद सादीक शेख (३०) रा. नवा नकाशा, लष्करीबाग हा आपल्या काही मित्रांसह निवडणुकीच्या मुद्यावरून चर्चा करीत होता. त्यावेळी दुसऱ्या गटाचे जहांगीर हफीज खान (२५), अब्दुल कुय्यम शहाबाज ऊर्फ मंजूर खान, सलमान आरिफ अंसारी, सद्दाम खान अजीज खान सर्व रा. नवा नकाशा आणि मोसीन खान साजीद खान ऊर्फ जॉन, इरफान अहमद वकील अहमद आणि इतर सहा ते सातजण तेथे आले. त्यांनी आसिफ आणि त्याच्या मित्रांसोबत वाद घातला आणि तलवार, चाकू, काठय़ा घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी आसिफ शेख याच्या पाठित एकाने चाकू खुपसला. रस्त्यावर दंगल उसळल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या भीतीने आरोपी पळून गेले. दरम्यान, एक पिस्तूल रस्त्यावर पडून होते. त्यानंतर आसिफच्या घरावरही दगडफेड झाली. त्यामुळे त्याच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.