३८ प्रभागात ११३५ उमेदवार रिंगणात; आज मतदान

नागपूर महापालिकेच्या ३८ प्रभागातील एकूण १५१ वॉर्डात मंगळवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. २० लाख ९३ हजार ३९२ मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी २ हजार ७८३ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मतदारांना प्रथमच चार मते द्यायची आहेत. त्यांच्यापुढे ‘नोटा’ (नकारात्मक मतदान)चा ही पर्याय आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
Election Commission ,Lok Sabha election
लोकजागर: अमर्याद खर्चाची ‘मर्यादा’!

१५१ जागांसाठी ७६ महिलांसह एकूण १ हजार १३५ उमेदवार मैदानात आहेत.

यात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, विदर्भवादी संघटनांसह अनेक स्थानिक आघाडय़ांच्या उमेदवारांचा समावेश आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने सहा महिन्याआधीपासून प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली. सुमारे एक लाखांवर अधिक नवमतदारांनी त्यांची नोंद मतदान म्हणून केली आहे.

निर्भयतेने मतदान व्हावे म्हणून सर्वच केंद्रावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त असणार आहे. १६२ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी निवडणुकीत व्यस्त असून ३ हजार ७७ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि ९ हजार ४५६ बॅलेट युनिट आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी थेट लढत या निवडणुकीत आहे. काही प्रभागात बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रभाव आहे. यावेळी अपक्ष उमेदवारांचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. सर्वात जास्त उमेदवार प्रभाग क्रमांक २ मध्ये (५१) तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक ३८ मध्ये (१४) आहेत. एका वॉर्डात सर्वात जास्त प्रभाग ५ ड मध्ये (२०) तर सर्वात कमी प्रभाग ३६ ब मध्ये (२) उमेदवार आहेत. या प्रभागात भाजपच्या पल्लवी श्यामकुळे यांच्या विरोधात काँग्रेसच्या रेखा बाराहाते रिंगणात आहेत, तर ३७ ब व क मध्ये प्रत्येकी ३-३ उमेदवार आहेत.

प्रभाग – ३८  उमेदवार – ११३५

मतदार – २० लाख ९३ हजार ३९२

मतदान केंद्र – ९६१ इमारती – २७८३ (बुथ)

संवेदनशील मतदान केंद्र – १६२

सर्वात जास्त उमेदवार प्रभाग २ – ५१ उमेदवार

सर्वात कमी उमेदवार – प्रभाग क्रमांक ३८ – १४ उमेदवार

प्रभाग ३६ ब मध्ये – २ उमेदवार

प्रभाग ५ ड मध्ये – २० उमेदवार

मतदानासाठी ओळखपत्र

पासपोर्ट, वाहन चालविणाचा परवाना, आयकर विभागाचे पॅन कार्ड, केंद्र व राज्य शासन कार्यालयातील ओळखपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे, स्वातंत्र्य सैनिकांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा परवाना, मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी पत्र, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे छायाचित्र असलेले पासबुक, वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेल्या आरोग्य विमा योजेनेचे ओळखपत्र, आधार ओळखपत्र आणि निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र.

येथे शोधा नाव

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी नागपूर महापालिकेच्या डब्ल्यूडब्ल्यूडॉट एनएमसीइलेक्शन२०१७डॉटओरजी आणि ट्र वोटर अ‍ॅप्स या वेबसाईटवर मतदारांना मतदार यादीत नावे आणि मतदान केंद्र शोधता येईल.

अपंगासाठी सुविधा

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार ७८३ मतदान केंद्र असून सर्व इमारतीमध्ये दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर १ ते ८००च्या जवळपास मतदार निश्चित करण्यात आले आहेत. एकूण २ हजार ७८३ पैकी केवळ दोन मतदान केंद्र दिव्यांगांसाठी असून त्या ठिकाणी रॅम्प आणि डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. ताजाबाद माध्यमिक विद्यालय सिंधीबन उमरेड रोड, नागपूर, सेंट विन्सेंट हायस्कूल उदयनगर चौक या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय अपंगांना या दोन ठिकाणी जाणे शक्य नाही, अशा मतदारांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी सोय करण्यात आली आहे.

मतदान यंत्रे व साहित्य केंद्रांवर पोहोचले

महापालिका निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार असून त्यासाठी नागपुरातील ३८ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे सोमवारी दुपापर्यंत पोहोचली. मतदान यंत्र व इतर साहित्य नेण्यासाठी या सर्व मतदारसंघातील वितरण केंद्रांवर अधिकाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. नागपूर शहरात २ हजार ७८३ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीच्या व्यवस्थेसाठी नागपुरात आदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नागपूर शहरातील सर्व केंद्रांवर मतदान यंत्रे व निवडणूक साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सकाळपासून गर्दी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना साहित्य घेताना कसरत करावी लागली.

सकाळी ९ वाजेपासून केंद्रांवर निवडणुकीच्या व्यवस्थेची जबाबदारी दिलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा जवान हजर झाले होते. तेथे त्यांना प्रत्येक मतदान केंद्रांचे वाटप करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्ये सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल, धरमपेठ झोनमध्ये प्रॉव्हीडन्स गर्ल्स हायस्कूल, हनुमाननगर झोनमध्ये बचत भवन सीताबर्डी, नेहरूनगर झोनसाठी राजीव गांधी सभागृह, गांधीबाग झोनमध्ये महापालिकेच्या टाऊन हॉलमधील झोन कार्यालयातून, सतरंजीपुरा झोनमध्ये महापालिकेच्या झोनमधील नव्या इमारतीमध्ये, लकडगंज झोनमध्ये विनायकराव देशमुख विद्यालय, आशीनगर झोनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ललित कला भवन ठवरे कॉलनी, मंगळवारी झोनमध्ये तिडके महाविद्यालय, आरबीजीजी कार्यालय जिल्हा परिषद शासकीय माध्यमिक विद्यालय आणि दुर्गानगर कार्यालयातून सिटीझन एज्युकेशन सोसायटी मानेवाडा रोड या १२ झोनमधून शहरातील विविध प्रभागात साहित्य वाटप करण्यात आले.

प्रत्येक साहित्य वाटप केंद्रावर दुपारी १२ नंतर गर्दी झाल्यामुळे अनेकांना साहित्य घेताना अडचणी आल्या.

प्रत्येक साहित्य वाटप केंद्रावर चार ते पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी टाऊन हॉलमधून सकाळी ११ पासून साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी साहित्यामध्ये मतदान यंत्रे, मतदार यादी व इतर साहित्य देण्यात आले. मतदान व्यवस्थेसंबंधी माहिती देण्यात आली. मतदान यंत्रे ताब्यात घेतल्यानंतर ती तपासण्यात दुपारी कर्मचारी मग्न झाले होते.

दुपारनंतर प्रत्येक केंद्रांवरील निवडणूक यंत्रणा पथके कडक सुरक्षेत बसमधून संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली.

उद्या, मंगळवारी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रांसह मतपेटय़ा याच केंद्रांवर परत आणल्या जातील. एका कुलूपबंद खोलीत त्या ठेवल्या जातील. त्या ठिकाणी चोवीस तास बंदूकधारी जवानांचा पहारा राहणार आहे.