21 January 2018

News Flash

मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारगाणी

या बदलांचे प्रतिबिंब प्रचारादरम्यान वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमधून पाहायला मिळत आहेत.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: February 22, 2017 2:47 PM

 

‘झिंग झिंग झिंगाट’पासून ते देवीच्या गोंधळाच्या चालीवर गाणी 

शहरातील विविध प्रभागात प्रचाराचा जोर वाढला आहे. पदयात्रा, जाहीर सभा आणि घरोघरी जनसंपर्क या माध्यमातून प्रचाराची पद्धत ही पारंपरिकच असली, तरी काळानुरूप त्यात बदल झाले आहेत. या बदलांचे प्रतिबिंब प्रचारादरम्यान वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमधून पाहायला मिळत आहेत.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या दीड दोन वर्षांत लोकप्रिय झालेल्या गाण्यांवर विविध राजकीय पक्षांनी गाणी तयार केली असून ती प्रचारादरम्यान वस्त्या वस्त्यांमधून वाजविली जात आहेत. सैराटमधील ‘झिंग झिंग झिंगाट’पासून ते देवीच्या गोंधळाच्या चालीवर गाणी तयार करण्यात आली आहेत.

प्रचार आणि प्रसार करताना ‘ध्वनिमुद्रित’ घोषणा व गाणी असलेला ध्वनिक्षेपकठेवलेली सायकलरिक्षा किंवा ऑटोरिक्षा वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरवणे हा प्रचाराचा लोकप्रिय, स्वस्त आणि सोपा मार्ग आहे. चार वॉर्डाचा एक प्रभाग करण्यात आल्यामुळे ५० ते ६० हजार मतदारांपर्यत पायपीट करून जाणे शक्य नाही.

मतदार किंवा राजकीय पक्षांना प्रभावित करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये पक्षाची ओळख निर्माण करण्यासाठी उमेदवारांचा मतदारांशी वारंवार जनसंपर्क होत नसला तरी ध्वनिमुद्रित गाण्यांच्या माध्यमातून घरोघरी प्रचार केला जात आहे. त्यामुळे उमेदवाराला पायपीट करण्याची गरज पडत नाही. एक-दोघांपेक्षा जास्त माणसेही लागत नाहीत आणि एकदा घोषणा ध्वनिमुद्रित केल्या की दूरवरून बरीच माणसे प्रचारासाठी फिरत असल्याचा आभासही निर्माण करता येतो.

या प्रचाराच्या रिक्षांमधून ध्वनिवर्धकावरून लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचे प्रचारानुकूल विडंबनही ऐकवण्यात येते.  गाण्यांचे प्रकार कुठलेही असो, निवडणूक प्रचाराच्या काळात दिवसभर मतदारांच्या कानावर अशी गाणी आदळणे अपरिहार्य झाले आहे.

‘जाऊ द्या, दोन तीन दिवसाचा त्रास आहे’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याची मतदारांनाही सवय झाली असली तरी उमेदवारांना हे प्रचाराचे माध्यम मतदारापर्यंत पोहचण्यासाठी मदत करते, हे मात्र तितकेच खरे.

मराठीसह हिंदी गाणीही प्रचारात

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘सैराट’च्या झिंग झिंगाट आणि देवीच्या जोगवा या गाण्याचा सगळ्यात जास्त उपयोग करून घेतला जात आहे. प्रत्येक उमेदवार स्वत:च्या पक्षाचे नाव, धोरणे, कार्यक्रम यानुसार गाण्यात बदल करून ते वाजवतो आहे. याशिवाय, नवीन चित्रपटातील मराठी आणि हिंदी गाणीही प्रचारात आहे. अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीत वापरली गेलेली ‘जय हो’ आणि ‘सुनो गौर से दुनियावालों’ या गाण्यांचाही पुनर्वापर होतो आहे. काही जणांनी उडत्या चालींची गाणी वापरण्याऐवजी प्रचाराला देशभक्तीची किनार देत ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की धरती’ आणि ‘ये देश है वीर जवानों का’ अशी गाणीही ऐकवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

First Published on February 17, 2017 12:30 am

Web Title: nagpur elections 2017 election song
  1. No Comments.