अनेक बुथवर उमेदवारांचा गोषवारा लावण्यास विसर

मतदारांनी त्यांच्या प्रभागातील प्रतिनिधी निवडताना तो कोण आहे? त्याची आर्थिक आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी कशी आहे आणि त्याची शैक्षणिक पात्रता किती आहे याची माहिती मिळावी म्हणून या निवडणुकीपासून उमेदवारांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे विवरण बहुतांश केंद्रावर लावले खरे पण मतदारांनी मतदान करताना याकडे दुर्लक्षच केले, असे चित्र मंगळवारी मतदाना दरम्यान सर्वत्र दिसून आले.

मतदान झाल्यानंतर उमेदवाराच्या निवडी विषयी चर्चा केली जाते. तो गुन्हेगार आहे, त्याने अवैध संपत्ती गोळा केली आहे, असे या चर्चेचे स्वरूप असते. अनेक वेळा मतदारांना उमेदवारांच्या सांपत्तीक आणि  गुन्हेविषयक बाबींची माहिती नसते. ती व्हावी म्हणून यंदा आयोगाने प्रत्येक केंद्राबाहेर रिंगणातील उमेदवारांबाबत माहिती फलकच लावले होते. मात्र फार थोडय़ा मतदारांनी त्याकडे लक्ष दिले व नंतर मतदान केले. बहुतांश मतदारांना असे काही फलक लागले आहे किंवा नाही हे सुद्धा पाहिले नाही. काही केंद्रावर फलकच लागलेले नव्हते.

मध्य नागपूर</strong>

मध्य नागपुरात उमेदवारांच्या गोषवाऱ्याकडे मतदारांनी पाठ फिरविली. बुथ क्रमांक ६२ आणि ६३ मध्ये निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवारांवरील गुन्ह्य़ासह संपत्तीचा गोषवाराच लावण्यात आला नव्हता. मोमीनपुरातील मोहम्मद जाहील याला विचारले असता त्याला या गोषवाराची माहितीच नसल्याचे त्याने सांगितले.

पूर्व नागपूर

पूर्व नागपुरातील अनेक प्रभागातील मतदान केंद्रावर फलक नव्हते. त्यामुळे गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवाराची गुन्हेविषयक माहिती मतदारांना बघायला मिळाली नाही. विशेषत: शहरातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या अनिल धावडे यांच्या प्रभाग २२ मधील सात बुथवर उमेदवारांचा गोषवारा लावण्यात आला नव्हता. या प्रभागात ३७ उमेदवार रिंगणात असून धावडेच्या नावावर २१ गुन्हे आहेत. त्यात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कालावधीची शिक्षा होऊ शकेल, असा प्रलंबित प्रकरणाची संख्या १० तर ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले आणि एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे, अशा प्रकरणाची त्यांच्या नावावर ११ गुन्हे आहेत. अन्य उमेदवारांवर एकही गुन्हा नसल्याने धावडे याच्या निवासस्थान परिसर असलेल्या सात मतदान केंद्रावर तो लावण्यात आला नव्हता. त्या संदर्भात संबंधित मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याला विचारणा केली असताना आम्हाला गोषवारा मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी हात झटकले. प्रभाग २६ मध्ये वाठोडा हिवरीनगरमध्ये ब्रम्हानंद हायस्कूलमधील बुथक्रमांक ३७ ते ४० या चार बुथवर गोषवारा नसल्यामुळे मतदारांना त्याची माहिती मिळू शकली नाही. वर्धमान नगरातील प्रभाग क्रमांक २३ मधील क्वेटा कॉलनीतील तीन बुथवर गोषवारा दिसून आला नाही. या प्रभागात तीन उमेदवार असे आहेत की त्यांच्यावर गुन्हे आहेत. अनेक मतदान केंद्रावर गोषवारा लावला असताना मतदारांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करीत मतदान केले.

दक्षिण नागपूर

उमेदवारांची संपत्ती, गुन्हेविषयक माहिती, व्यवसाय, शिक्षण याची त्रोटक माहिती असलेले बॅनर मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आले होते. मात्र, प्रभाग ३०/६० याठिकाणी बॅनर होते पण, ते लावले नव्हते तर ते तसेच ठेवण्यात आले होते. प्रभाग ३२/४९ आणि ५०मध्ये अयोध्यानगरातील तृप्ती कॉन्व्हेंटमध्ये उमेदवारांची माहिती असलेले फलक लावलेले नव्हते. मात्र, असे फलक निवडणूक आयोगाकडून आम्हाला मिळालेच नाहीत, अशी प्रतिक्रिया मतदान केंद्राधिकाऱ्याने दिली. आशीर्वादनगरातील ठाकरे हायस्कुलमध्ये योग्यपद्धतीने उमेदवारांची माहिती असलेले वाचनीय फलक योग्य पद्धतीने लावण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी ते वाऱ्यावर हेलकावे खात होते, काही ठिकाणी दुमडले होते. काही ठिकाणी आकाराने खूपच लहान असल्याने वाचता येत नव्हते. एखादी व्यक्ती सोडली तर लोक त्या बॅनरकडे ढुंकूणही पाहत नव्हते.

पश्चिम नागपूर

पहिल्यांदाच यावेळी मतदान केंद्रावर उमेदवारांची संपूर्ण माहिती, आर्थिक गोषवारा, शैक्षणिक माहिती असलेला माहिती फलक लावण्यात आला होता. मात्र, पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्र. २ वगळता इतर केंद्रावर मतदारांनी या फलकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. या केंद्रावरील शेखर सहारे हे त्यांच्या पत्नीला हा फलक दाखवत होते आणि पक्ष पाहून नाही, तर काम करणारी व्यक्ती पाहून मत देण्यास सांगत होते. याबाबत त्यांना विचारल्यानंतर निवडून कुणीही आले तरी गरिबाला त्यांनी मदत केली पाहिजे. उमेदवार कोणत्याही समाजाचा असो आम्हाला देणेघेणे नाही. आमच्या समस्या समजावून घेणारा, आम्ही गेल्यानंतर सहज भेटणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रभाग १४ मधील कोलपुरा, मनपा लायब्ररी, सुरेंद्रगड परिसरातील मनपा शाळा, प्रभाग-१० मध्ये बोरगाव परिसरातील उर्दू शाळा आणि लोकप्रिय विद्यालयातील मतदार केंद्रांसमोर त्या-त्या प्रभागाच्या उमेदवाराचे शिक्षण, संपत्ती आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी आदींचा गोषवारा एका फलकावर लावण्यात आला होता. परंतु मतदान करण्यासाठी येणाऱ्या लोकांनी त्याकडे अक्षरश: दुर्लक्ष केले. यावरून मतदार हे घरूनच कुणाला मतदान करायचे आहे, याचा निश्चय करून येत होते, असे दिसते. मात्र, प्रभाग-८ मधील मेकोसाबाग परिसरात असलेल्या भोला हायस्कूल मतदान केंद्रावर काही महिला उमेदवारांचा गोषवारा वाचताना दिसल्या. तर काही महिला मतदान कसा करावा, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून लावण्यात आलेल्या सूचना वाचून एकमेकांना समजावून सांगत होत्या.

दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये प्रभाग ३३ रामेश्वरी रोड येथील बुथ क्रमांक ३३ सनराईज शाळेच्या मतदान केंद्रावर उमेदवाराचा गोषवारा गायब होता. तर प्रभाग क्रमांक ३५ येथील ओएस्टर इंग्लिश शाळेच्या मतदान केंद्रावर शाळेच्या प्रांगणात असलेल्या घसरगुंडीवर गोषवारा बांधण्यात आले असल्याने मतदारांचे लक्ष त्याकडे गेले नाही. तर प्रभाग श्रीनगर क्रमांक ३५ मध्ये धनश्री नागरिक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर पहिल्या माळ्यावर गोषवारा लावण्यात आल्याने तो मतदारांना वाचता आला नाही.

उत्तर नागपुरात उत्तर नागपुरातील असे अनेक मतदान केंद्र होते. ज्या ठिकाणी उमेदवाराचा गोषवार लावण्यात आला नव्हता आणि ज्या ठिकाणी लावण्यात आला होता. तो दर्शन भागात नव्हता. काही ठिकाणी तर उंचावर टांगण्यात आला. उत्तर नागपुरातील मतदारांशी बोलण्यानंतर असे दिसू आले की, कुणाला गोषवाऱ्याची माहिती देखील नव्हती. मौलाना अब्दुल कलाम आझाद इंग्लिश आणि ऊर्दू प्रायमरी स्कूलमध्ये मतदानाला आलेल्या बुद्धनगर रहिवासी सुनीता पिल्लेवान यांनी गोषवारा कुठे लावण्यात आला आहे, असा सदर प्रतिनिधीला प्रश्न विचारला.

अनेक केंद्रावर विवरणच बेपत्ता 

आयोगाने एक महिन्याआधी उमेदवाराचे विवरण प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र अनेक केंद्रावर ते लावण्यातच आले नाही. काही ठिकाणी ते मतदारांच्या नजरेस पडणार नाही, अशा ठिकाणी लावण्यात आले होते.