शासन व निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय ‘एल्गार’

भाजपने महापालिकेच्या निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप विविध पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी केला असून निवडणूक आयोगाच्या आणि शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला. मतदान प्रक्रियेमध्ये उपयोगात आणलेल्या ईव्हीएमची मशीनची चौकशी करावी आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महापालिकेच्या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये मोठय़ा अनियमितता आणि घोटाळा झाल्यामुळे त्याचा फटका विविध राजकीय पक्षातील उमेदवारांना बसल्याचा आरोप करून पराभूत उमेदवारांनी एकत्र येऊन या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला. सीए मार्गावरील हॉटेल जॅक्सनमध्ये काँग्रेसचे नेते नगरसेवक सुरेश जग्यासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमन ठवकर व ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली असून त्यात सर्वानी निवडणूक आयोगाने राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करीत त्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी सुरेश जग्यासी म्हणाले, ज्या उमेदवाराचा प्रभागात प्रभाव नाही किंवा प्रचार केला नाही, असा भाजपचा उमेदवार पाच हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून येतो आणि दिवस रात्र मेहनत करून प्रभागातील अनेक लोक ज्याच्या पाठीशी असताना त्याला मात्र हजार ते दीड हजार मते मिळतात. त्यामुळे हा ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोटाळा असून निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी,  अनेक प्रभागांमध्ये पहिल्या चार फेऱ्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि इतर पक्षाचे उमेदवार समोर असताना पाचव्या फेरीत भाजपच्या उमेदवाराला एकतर्फी सर्व मते कशी मिळतात, असा प्रश्न उपस्थित करून जग्यासी यांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्ती केली. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांचे निवेदन निवडणूक आयोगाला देणार असून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. बैठकीला मुस्लिम लिगचे अस्लम खान, शिवसेनेचे बंडू तळवेकर, किशोर पराते, रमन ठवकर, कांता पराते, सुशील बालपांडे, मनसेचे प्रशांत निखारे यांच्यासह एमआयएम, मनसे, पुरोगामी लोकाशाही आघाडी, बसपा आदी राजकीय पक्षाचे पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कुटुंबाची मते २७, मिळाली केवळ ९

प्रभाग क्रमांक ३ च्या एका बुथवर कुटुंबाची २७ मते असताना मला केवळ ९ मते मिळाली. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या निवडणुकीला रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी निवडणुकीतील उमेदवार राज खत्री यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. मतमोजनीच्या वेळी मला अधिकाऱ्यांनी २ हजार ७०० मते मिळाल्याचे सांगितले. वास्तविक मला केवळ १ हजार ७७ मते मिळाल्याचे दाखवण्यात आले. हा प्रकार या निवडणुकीत घोळ झाल्याचे स्पष्ट करीत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून ही निवडणूक मतपत्रिकेवरच घेण्याची मागणी त्यांच्यासह नवजवान खिदमत बहुउद्देशीय संस्थेच्यावतीनेही करण्यात आली. पारदर्शी पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी सुनीता ढोले यांनी केली. आमच्याकडे बोगस मतदानासह इतर अनेक गैरप्रकाराचे पुरावे असून न्यायालयासह जनतेच्या समोर ते मांडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां प्रणोती प्रशांत धवड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापौरांचा पदग्रहण समारंभ होऊ देणार नाही -बाळबुधे

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकली आहे. तातडीने ही निवडणूक पुन्हा घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही, तर महापौरांचा पदग्रहण समारंभ होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ईश्वर बाळबुधे यांनी दिला.