पत्नीच्या हत्येनंतरही वैष्णोदेवीचे मंदिर गाठले

पाच जणांचे बळी घेऊन क्रूरकर्मा विवेक पालटकर हा देवदर्शनाला गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विवेकभ्रष्ट आरोपीने याआधीही पत्नीचा खून करून वैष्णोदेवीचे मंदिर गाठले होते. हत्या केल्यानंतर तो प्रायश्चित करण्यासाठी असे देवदर्शनाला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत राहणारे भाजपचे कार्यकर्ते कमलाकर मोतीरामजी पवनकर, अर्चना कमलाकर पवनकर, वेदांती कमलाकर पवनकर, मीराबाई मोतीरामजी पवनकर आणि कृष्णा विवेक पालटकर सर्व रा. प्लॉट क्रमांक ५, आराधनानगर यांचा विवेकने सब्बलने झोपेत असतानाच खून केला.

या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी नऊ पथके तयार केली आहेत. आरोपीचे सर्व नातेवाईक, त्याच्या संपर्कात असलेले हॉटेलमध्ये काम करणारे सहकारी, अशा एकूण ७० जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

मात्र, अद्याप कोणाकडूनही पोलिसांना ठोस पुरावे सापडले नाहीत.  तो पत्नीचा खून केल्यानंतर जम्मू येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला होता. तशाप्रकारे आताही देवदर्शनाला जाण्याची शक्यता असून त्यासाठी देशभरातील प्रमुख देवस्थान असलेल्या शहरातील पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या हत्याकांडातील सर्व मृतांवर काल सोमवारी दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतून बचावलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा ताबा पवनकर यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आला आहे.

शेतीतून २५ हजार रुपये मिळवले

नवरगाव येथील ज्या दहा एकर शेती व पैशावरून त्याने आपली बहीण, जावई व इतरांचा खून केला, ती शेती त्याने काही महिन्यांपूर्वी बटईने दिली असून त्यातून त्याला २५ ते ३० हजार रुपये मिळाले आहेत. त्या पैशातून तो काही दिवस आपला खर्च भागवू शकतो.