प्रत्येक झोनमध्ये होणार कार्यक्रम; महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून निर्णय
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सांस्कृतिक महोत्सवाचे टप्प्याटप्प्याने आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सलग एकच होणारा नागपूर महोत्सव आता दहा क्षेत्रनिहाय आयोजित करण्यात येणार असल्याने या महोत्सवाची रयाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त स्थानिक कलावंताना वाव मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०१७ मध्ये प्रस्तावित आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. सलग दहा वर्षांपासून कायम असलेली सत्ता हातून जाऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे आतापर्यंतच्या सत्तेत असूनही भाजपला आपली छाप पाडता न आल्याने त्यांच्याविषयी कमालीची नाराजी आहे. त्यामुळे विरोधकांनी हाच मुद्दा जनतेपुढे नेण्याचे प्रयत्न सुरु केल्याने त्यांचेही कडवे आव्हान समोर आहे. त्यावर मात करण्याच्या अनुषंगाने भाजपने आता सांस्कृतिक महोत्सवाचा आधार घेतला आहे. दरवर्षी भव्यदिव्य स्वरुपात साजरा होणारा महापालिकेचा नागपूर महोत्सव यंदा एकाच ठिकाणी साजरा न करता टप्प्यांमध्ये दहा क्षेत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रथमच हा प्रयोग करण्यात आला असून, त्या त्या भागातील कलावंत आणि रसिकांना यात सहभागी करून घेता यावे म्हणून असा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षी या महोत्सवात स्थानिक कलावंताना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यांचा एखादा कार्यक्रम आयोजित करुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताना आमंत्रित केले जाते आणि त्यावर कोटय़ावधी रुपये खर्च केले जातात. यंदा या कलावंतांची आठवण होणे यामागे निवडणुकीचे राजकारणच असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने विकास कामे थांबली आहेत. या पाश्र्वभूमीवर यंदा या महोत्सवाचे स्वरुप साधे असण्याची अपेक्षा होती. मात्र आयोजकांची यासंदर्भातील तयारी लक्षात घेता त्यात साधेपणाला वाव नाही.

२५ ते २८ला कार्यक्रम
महोत्सव २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत स्टेडियमवर होणार आहे. त्यापूर्वी १९ फेब्रुवारीला दहाही झोनमध्ये एकाच दिवशी त्या भागातील कलावंताचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी गायक अरजिंतसिंग, तबालवादक उस्ताद झाकीर हुसेन, हरिहरन यांना निमंत्रित करण्याचा मानस आहे.राज्य शासन यासाठी दोन कोटी रुपये देणार आहे. त्यातून महापालिका प्रत्येक झोन कार्यालयाला १ लाख रुपये देणार आहे. महोत्सवाची रुपरेषा लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच अंतिम रुप दिले जाणार आहे.