मुख्यमंत्री कार्यालयाकडून कारवाई

नागपूर : एकाच रुग्णाच्या उपचाराचे देयक महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि रुग्ण अशा तिघांकडूनही वसूल करणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची दोनदा उचल करणे, अशा कारणांमुळे शहरातील चार खासगी रुग्णालयांना मुख्यमंत्री कार्यालयाने दणका दिला आहे. या रुग्णालयांवर निधीत अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

काळ्या यादीत गेलेल्या रुग्णालयांमध्ये केअर रुग्णालय, विनस हॉस्पिटल, एचजीसी नार्ची, न्यू ईराचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यवस्थ गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष नागपुरात सुरू केला आहे. या कक्षाकडून प्रत्येक आठवडय़ात विदर्भाच्या विविध खासगी वा शासकीय रुग्णालयांत अत्यवस्थ गरीब रुग्णाच्या उपचारासाठी पैसे मंजूर केले जातात. हा निधी संबंधित रुग्णाचे अर्ज मंजूर झाल्यावर विशिष्ट प्रक्रिया करून थेट रुग्णालयांच्या खात्यात वळता केला जातो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाला आवश्यक निधी उपलब्ध होत असल्याने त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची गरज नसते.

या चारपैकी काही रुग्णालयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळाल्यावरही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतूनही रुग्णाच्या देयकाची उचल केली. रुग्णाकडूनही देयकाचा निधी वसूल केला व सोबतच काहींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची दोनदा उचल केली. अखेर या रुग्णालयांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त अध्यक्ष असलेल्या समितीपुढे आले व नंतर शासनाच्या वरिष्ठ स्तरावर गेले. या कारवाईमुळे या रुग्णालयांना यापुढे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळणार नाही. त्यातील काहींना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतूनही बडतर्फ केले गेले असून काहींवर कारवाईबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या कारवाईला दुजोरा दिला.

चांगल्या रुग्णालयाची बदनामी योग्य नाही

मुख्यमंत्री कार्यालयाने न्यू ईरा रुग्णालयात अद्याप एकाही रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतले वा इतर काही तक्रारीबाबत पत्र वा चौकशी केली नाही. येथील रुग्णांच्या देयकाबाबत पारदर्शी काम केले जाते. कुणाला काही प्रश्न असल्यास त्याचे उत्तर दिले गेले असते. या पद्धतीने कुणा चांगल्या रुग्णालयाची बदनामी करणे योग्य नाही.’’

– डॉ. आनंद संचेती, संचालक, न्यू ईरा रुग्णालय.

२०१८ मध्ये पाच रुग्णालयांवर कारवाई

लोकसत्ताने गेल्यावर्षी वृत्तमालिकेतून नागपूरच्या शासकीय व खासगी रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांची कशा पद्धतीने लूट होत आहे, हे पुढे आणले होते. त्यावेळी अनियमितता करणाऱ्या मेडिट्रिना, क्रिसेन्ट, शतायू, केशव, श्रीकृष्ण हृदयालय या खासगी रुग्णालयांना महात्मा फुले योजनेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईचा दाखला घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयानेही या रुग्णालयांना काळ्या यादीत टाकले होते, हे विशेष.