वैद्यकीय सहसंचालकांच्या मेडिकल पाहणीतील धक्कादायक वास्तव

वैद्यकीय सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सोमवारी अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विविध वार्डासह तपासणी केंद्रांची पाहणी केली. बाह्य़रुग्ण विभागात औषधशास्त्रसह सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. वार्डामध्ये अनेक खाटांवर रक्ताने माखलेल्या चादरी बघून ते थक्कच झाले. हा पाहणी अहवाल ते शासनाला सादर करणार आहेत.

डॉ. लहाने सकाळी आठ वाजता कुणालाही सूचना न देता थेट मेडिकलच्या बाह्य़रुग्ण विभागात एकटेच पोहोचले. येथील औषधशास्त्र विभागासह सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा एकही डॉक्टर साडेआठ वाजेपर्यंत सेवेवर हजर नव्हता. ९ वाजताच्या सुमारास काही कनिष्ठ निवासी डॉक्टर आले, परंतु त्यानंतर एकही वरिष्ठ डॉक्टर आले  नाही. त्यामुळे रुग्णांच्या रांगा वाढत होत्या. वरिष्ठ व कनिष्ठ डॉक्टरांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. स्त्रीरोग विभागात सकाळी ११ वाजेपर्यंत विभाग प्रमुख आले नव्हते. लहाने यांनी त्यांच्या मोबाईलने दुरवस्थेचे चित्रण केले. नेत्र विभागात त्यांना रोज सुमारे २० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात असे सांगण्यात आले. ही संख्या ३० पर्यंत वाढवावी, अशी सूचना लहाने यांनी केली.

डॉ. लहाने यांनी मेडिकलच्या सुमारे १४ वार्डाची पाहणी केली. बऱ्याच वार्डामध्ये त्यांना रुग्णांच्या अंगावर फाटके कपडे तर त्यांच्या खाटांवर रक्ताने माखलेल्या चादरी  दिसून आल्या. याबाबत त्यांना स्वच्छ चादरी व रुग्णांचे कपडे लॉकरमध्ये ठेवण्यात आल्याचे  सांगण्यात आले. तीन-तीन दिवस खाटांवरील चादरी बदलल्या जात नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी लहाने यांच्याकडे केली. शल्यक्रिया विभागातील ओटी-एफ बघून त्यांनी अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. डॉ. राज गजभिये यांनी देणगी मिळवून हा विभाग विकसित केला. इतरही शल्यक्रिया गृह या पद्धतीने विकसित केल्यास रुग्णांना लाभ होईल, असे डॉ. लहाने म्हणाले.  दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉलेज काऊंसिलची त्यांनी बैठक घेतली.  औषधशास्त्र विभागासह सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांना विभागातील सेवेवर नियंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. लहाने यांनी सुपरस्पेशालिटी आणि ट्रामा केयर सेंटरचीही पाहणी केली. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात त्यांनी गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागातील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कामाची प्रशंसा केली.

बालरोग विभागात व्हेंटिलेटरची कमी

बालरोग विभागात वैद्यकीय सहसंचालकांना उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर रुग्णांच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनात आले. या विभागात सध्या एनआयसीयूच्या ३० तर पीआयसीयूच्या १० खाटा आहेत. प्रत्येक खाटांवर व्हेंटिलेटर गरजेचे असताना येथे केवळ १० व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध आहेत.

तपासणी अहवालाला विलंब

मेडिकलमध्ये रुग्णाचे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो. ही बाब लहाने यांच्या निदर्शनास आली. त्यात काही रुग्णांचा औषधोपचारही सुरू केला जात नसल्याचे त्यांना आढळले. त्यांनी मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना तातडीने एकाच दिवशी नमुने तपासणीसह रुग्णांवर उपचार सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली. अधिष्ठात्यांनीही रुग्ण हितात लवकरच त्यावर अंमलबजावणीचे आश्वासन त्यांना दिले.