शिक्षक परिषदेचे उमेदवार व माजी आमदार नागो गाणार यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला असला तरी शिक्षक परिषदेत पडलेली फूट, संघाने उभा केलेला उमेदवार आणि शिवसेनेची वेगळी चूल यामुळे  नागपूर शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसचा उमेदवार यंदा प्रथमच रिंगणात असल्याने प्रतिस्पर्धी घटक असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

पूर्व विदर्भातील नागपूरसह सहा जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण ३४ हजार मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या पाच हजाराने कमी आहे. यंदा एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रामुख्याने नागो गाणार (शिक्षक परिषद), आनंदराव कारेमोरे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ), अनिल शिंदे (काँग्रेस), प्रकाश जाधव (शिवसेना), राजेंद्र झाडे (शिक्षक भारती), संजय बोंदरे (अपक्ष), शेषराव बिजेवार (अपक्ष), खेमराज कोंडे (अपक्ष) आदींचा समावेश आहे. हा मतदारसंघ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी सलग तीन वेळा येथून विजय प्राप्त केला. मागील निवडणुकीत प्रथमच गाणार यांच्या निमित्ताने शिक्षक परिषदेने हा गड सर केला होता. मात्र हा विजय गाणार यांचा म्हणण्यापेक्षा डायगव्हाणे यांच्या विरोधातील लाटेचा होता असे म्हणावे लागेल. डायगव्हाणे नको, अशी भूमिका विमाशीतील अनेक पदाधिकाऱ्यांची होती, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बंडही झाले होते. डायगव्हाणे नको, असे म्हणणाऱ्यांनी गाणारांचा पर्याय निवडला होता. विदर्भ माध्यमिक संघाचा (विमाशी) गड सर करायचा म्हणून भाजप आणि संघ एकजुटीने गाणारांच्या पाठीशी उभे होते. पाच वर्षांत संपूर्ण चित्र बदलले. गाणार हे स्वत: स्वच्छ प्रतिमेचे आणि शिक्षकांच्या प्रश्नावर लढा देणारे असले तरी आमदार म्हणून प्रश्न सोडविण्यासाठी लागणारे राजकीय कौशल्य त्यांच्याकडे नसल्याने त्यांची कारकीर्द गाजली नाही. त्यांच्याविषयी परिषदेत नाराजी निर्माण झाली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच परिषदेत गाणार नको, अशी भूमिका घेणारा एक गट तयार झाला. सध्या परिषदेचे पूर्वीचे कार्यकते शेषराव बिजवार (अपक्ष), खेमराज कोंडे (अपक्ष) रिंगणात उतरले. गाणारांच्या विरुद्ध संघाचा पाठिंबा असल्याचा दावा संजय बोंदरे (अपक्ष) यांनी केला आहे. या सर्व प्रक्रियेत भाजपची भूमिका पूर्वी गाणार यांच्याबाबतीत तळ्यातमळ्यात होती; पण निवडणुका जाहीर झाल्यावर पक्ष गाणार यांच्या पाठीशी राहिला.

chart

विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश दिला. आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतल्यावर संघ आणि परिषदेतील गाणार विरोधक एकदिलाने कामाला लागल्यास गाणारांसाठी ही निवडणूक सोपी जाईल; पण सध्याचे चित्र वेगळे आहे. परिषदेतील बंडखोरीमुळे मतविभाजन मोठय़ा प्रमाणात होणार आहे. याशिवाय मित्रपक्ष शिवसेनेनेही प्रकाश जाधव यांच्या रूपात माजी खासदार रिंगणात उतरविला आहे. शिवाय गाणार यांच्यासह लढतीतील चार प्रमुख उमेदवार नागपूरचेच आहेत. त्यामुळे येथील मतांची वाटणी अटळ आहे. त्याचा फटका गाणार यांना बसू शकतो.

दुसरीकडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या वेळी एकजुटीने रिंगणात उतरली आहे. संघाचे उमेदवार आनंदराव कारेमोरे अनेक वर्षांपासून शिक्षक चळवळीत आहेत. मागील निवडणुकीत डायगव्हाणे यांना विरोध करणारे सर्व आता कारेमोरेंच्या प्रचारात आहेत. संघाची शक्ती पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्य़ांत अधिक आहे. खुद्द डायगव्हाणे कारेमोरेसोबत अर्ज भरण्यास आले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेत सध्या बेदिलीचे चित्र दिसत नसले तरी आतापर्यंत त्यांच्यासोबत राहणाऱ्या काँग्रेसने स्वत:चा उमेदवार दिल्याने त्याचा फटका कारेमोरेंना बसू शकतो.

काँग्रेसही रिंगणात

काँग्रेसचे अनिल शिंदे मूळचे चंद्रपूरचे आहेत. नागपूरनंतर सर्वाधिक मतदार हे चंद्रपूरमध्ये आहेत. अनेक वर्षांपासून ते शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य आणि संस्थाचालक संघटनेच्या माध्यमातून शिक्षण चळवळीत कार्यरत आहेत. काँग्रेस स्वत:चा उमेदवार या निवडणुकीत देत नव्हती. यंदा दिल्याने विमाशीसोबत जुळलेली या क्षेत्रातील मंडळी आता शिंदेंच्या प्रचाराला लागली आहे. विद्यापीठ राजकारणातील दिग्गज व काँग्रेस नेते प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी शिंदेसाठी शक्ती लावली आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. शिवसेना या वेळी काय चमत्कार करते हे पाहण्यासारखे राहील. सेनेची मते ही परिषदेच्या मतांना वजा करेल असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी गाणारांसाठी सभा घेऊन ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचा संदेश भाजप, संघ आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.