|| महेश बोकडे

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम

नागपूर :  करोनाच्या दुसऱ्या लाटेत खाटा न मिळाल्याने काही रुग्णांचा घरातच मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्ण व मृत्यू वाढल्यावर प्रशासनाने धडपड करत नागपुरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत करोनाग्रस्तांसाठी खाटा वाढवल्या. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आता नागपुरात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक प्राणवायू, अतिदक्षता, जीवनरक्षण प्रणालीच्या (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध असल्याचे सरकारच्या कोविड डॅशबोर्डवरील आकड्यावरून दिसत आहे.

कोविड डॅशबोर्डनुसार, राज्यात करोनाग्रस्तांसाठी गैरप्राणवायूच्या ३ लाख ४३ हजार ३४८ खाटा, प्राणवायूच्या ९६ हजार ६९०, अतिदक्षता विभागाच्या २९ हजार ९००, जीवनरक्षण प्रणालीच्या १२ हजार १५ खाटा उपलब्ध आहेत. राज्याची ११२.७ दशलक्ष लोकसंख्या बघता येथे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे प्राणवायूच्या ८५८, अतिदक्षता विभागाच्या २६५, जीवनरक्षण प्रणालीच्या १०७ खाटा आहेत. मुंबईत गैरप्राणवायूच्या ५९ हजार १७२, प्राणवायूच्या ४ हजार १०८, अतिदक्षता विभागाच्या १ हजार ३०, जीवनरक्षण प्रणालीच्या ५७८ खाटा आहेत. मुंबईची ३.१ दशलक्ष लोकसंख्या बघता येथे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे प्राणवायूच्या १ हजार ३२५, अतिदक्षता विभागाच्या ३३२, जीवनरक्षण प्रणालीच्या १८६ खाटा आहेत. मुंबई उपनगरमध्ये गैरप्राणवायूच्या २७ हजार ७०२, प्राणवायूच्या ९ हजार ८०९, अतिदक्षता विभागाच्या २ हजार ५५, जीवनरक्षण प्रणालीच्या १ हजार ४५ खाटा आहेत.

मुंबई उपनगरमधील ९.६ दशलक्ष लोकसंख्या बघता येथे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे प्राणवायूच्या १ हजार २२, अतिदक्षता विभागाच्या २१४, जीवनरक्षण प्रणालीच्या १०९ खाटा आहेत. नागपूर जिल्ह्यात बिगरप्राणवायूच्या १६ हजार ६३२, प्राणवायूच्या ९ हजार ९४४, अतिदक्षता विभागाच्या २ हजार ८०८, जीवनरक्षण प्रणालीच्या ९९६ खाटा आहेत. येथील ४.६ दशलक्ष लोकसंख्या बघता येथे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे प्राणवायूच्या २ हजार १६२, अतिदक्षता विभागाच्या ६१०, जीवनरक्षण प्रणालीच्या २१७ खाटांचा समावेश आहे. पुणे येथे गैरप्राणवायूच्या ४१ हजार ५४९, प्राणवायूच्या ११ हजार २०७, अतिदक्षता विभागाच्या ३ हजार ८२०, जीवनरक्षण प्रणालीच्या १ हजार ४८२ खाटांचा समावेश आहे. येथील ९.४ दशलक्ष लोकसंख्या बघता येथे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे प्राणवायूच्या १ हजार १९२, अतिदक्षता विभागाच्या ४०६, जीवनरक्षण प्रणालीच्या १५८ खाटा आहेत.

नागपुरात अचानक करोनाचे रुग्ण वाढल्यावर प्रशासनाने  शासकीय व खासगी रुग्णालयांत प्राणवायू, अतिदक्षता विभाग, जीवनरक्षण प्रणालीच्या खाटा वाढवल्या. त्यामुळेच आता प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक खाटा उपलब्ध आहेत.  या वाढीव खाटांचा तिसऱ्या संभाव्य लाटेतही रुग्णांना लाभ होईल. – जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका