09 March 2021

News Flash

२४ तासांत तब्बल ४६ करोना बळींचा उच्चांक!

आजपर्यंतची मृत्यू संख्या सहाशे पार; दिवसभरात ९८९ नवीन बधितांची भर

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या २४ तासांत नवीन ९८९ करोनाबाधित रुग्णांची भर पडली तसेच प्रथमच दिवसभरात ४६ जणांच्या मृत्यूचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या सहाशे पार (६२५ मृत्यू) गेली आहे.

मेडिकलमध्ये २४ तासांत ७ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यात  सिरसपेठ येथील ६८ वर्षीय महिला, खापरखेडा येथील ४० वर्षीय पुरुष, विकास नगर (कोंढाली) येथील ६० वर्षीय पुरुष, पिवळी नदी येथील ६१ वर्षीय महिला, गिट्टीखदान येथील ६७ वर्षीय पुरुष, अमरावती येथील ५८ वर्षीय महिला आणि एका ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या मृत्यूंमुळे मेडिकलमध्ये आजपर्यंत दगावलेल्यांची संख्या २९९ वर पोहचली आहे. यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण दगावलेल्या अथवा अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात पोहचले होते.

मेयो रुग्णालयातही दिवसभरात १३ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यात महिला संवर्गातील ७१, ६४, ७५, ५५, ६५, ६५ वर्षीय रुग्णांचा समावेश होता.  येथे पुरुष संवर्गातील ८५, ५२, ७१, ५९, ३७, ८४, ६३ वर्षीय रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला.  या ४६ रुग्णांमध्ये ३८ रुग्ण नागपूर शहरातील, ४ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील,

४ रुग्ण नागपूर जिल्ह्यबाहेरचे आहेत. विदर्भातील सर्वाधिक मृत्यू नागपुरात नोंदवण्यात आले आहेत.

९८९ नवीन बाधित आढळल्याने आजपर्यंतच्या बधितांची संख्या साडेसतरा हजार पार (१७,७२२ रुग्ण) गेली आहे. त्यात शहरातील १३,३९२ तर ग्रामीणच्या ४,३३० रुग्णांचा समावेश आहे.

करोनामुक्तांची संख्या ७,६३६ वर

गेल्या २४ तासांत २०७  कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे उपचारातून बरे होऊन करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढून ७ हजार ६३६ पर्यंत पोहोचली आहे. गृहविलगीकरणासह करोनामुक्त होण्याचे नागपुरातील हे सरासरी प्रमाण गुरुवारी चार टक्क्यांनी वाढले. ४४ वरून ते ४८. ८९ टक्क्यांवर आले आहे. शहरात सध्या तब्बल ५,७२८ बाधित गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.  शहरात ८,४३३ सक्रिय रुग्ण आहेत.

मेडिकलचे दोन विभागप्रमुख बाधित

करोनाचा विळखा आता आरोग्य कर्मचाऱ्यातही घट्ट होत आहे. मेडिकलच्या दोन विभाग प्रमुखांसाह एम्सच्या एका वरिष्ठ डॉक्टरलाही करोनाची बाधा झाली आहे. डॉक्टर, परिचारिका, परिचरसह इतरही बरेच कर्मचारी बाधित होत आहेत.

यापूर्वी सर्वाधिक ४० मृत्यूची नोंद

नागपुरात यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४० मृत्यू झाले होते. याशिवाय दोन वेळा ३९ जण दगावले होते. १२ ऑगस्ट रोजी ३८ जण एकाच दिवशी दगावले होते. परंतु गुरुवारी, २० ऑगस्टला नागपूर शहरातील करोना मृत्यूमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

अंत्यसंस्कारात बाधा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

नागपूर जिल्ह्यत करोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. या मृतदेहाचे अंत्यसंस्कार त्यांच्या स्थानिक क्षेत्रात शासनाच्या सूचनेप्रमाणे करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या अंत्यसंस्कारात बाधा निर्माण करणा ऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. काही क्षेत्रात करोनामुळे मृत झालेल्या व्यतीवर अंत्यसंस्कार करण्याबाबत स्थानिक नागरिकांचा विरोध असतो, त्यामुळे  मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी नेणे भाग पडते. अशा ठिकाणी सुद्धा कधी कधी लोकांचा विरोध होतो. हे टाळण्यासाठी यापुढे मृताच्या क्षेत्रातील  दहन घाटावरच अंत्यसंस्कार करण्यात येतील. या कामात कोणी बाधा आणल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता अनुसार कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:02 am

Web Title: nagpur high of 46 corona victims in 24 hours abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सेव्हन स्टार रुग्णालयाला उच्च न्यायालयाचा दिलासा
2 Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशीही हजारावर बाधित
3 व्यापाऱ्यांच्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Just Now!
X