५५ वर्षांपूर्वी संपादित केलेली जमीन विकण्याचा प्रयत्न

नागपूर सुधार प्रन्यासने अधिग्रहित केलेली जमीन कागदोपत्री त्यांच्या नावे झाली नसल्याची संधी साधत मूळ जमीन मालकाने ती पुन्हा विकण्याचा केलेला प्रयत्न ऐनवेळी लक्षात आल्याने प्रन्यासने तो हाणून पाडला. या प्रकरणामुळे सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जमिनीची त्यांच्या नावावर नोंद आहे किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९६० मध्ये सुधार प्रन्यासने हिवरी येथील जमीन (०.३९ हे.आर) मन्नुमिया शेख मिया पटेल यांच्याकडून अधिग्रहित केली होती. परंतु नंतर प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद कागदोपत्री करण्याची कारवाई पूर्ण केली नाही, त्यामुळे तलाठय़ाच्या कागदपत्रावर मूळ जमीन मालकांचीच नोद होती. त्यामुळे त्यांने काही स्थानिक भूमाफियांची मदत घेऊन ती पुन्हा विकण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

याची महिती प्रन्यासला झाल्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत पावले उचलली. जमीन आपली असून त्यासंबंधीच्या कागदपत्रावर प्रन्यासचे नाव नोंद करावे यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज दाखल करण्यात आला. यावर ८ मार्चला सुनावणी झाली. दोन्ही बाजूंची माहिती घेतल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर प्रन्यासचे नाव नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागपूरचे तहसीलदार सतीश समर्थ यांनी ७/१२ वर तशी नोंद केली.

५५ वषार्ंपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचे हे प्रकरण असून प्रन्यासच्या लक्षात आल्यामुळे संकट टळले. मात्र शहरात अनेक अशा जागा आहेत की ज्या पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक काळापूर्वी संपादित केलेल्या आहेत, त्याची नोंद प्रन्यासच्या नावावर आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याची वेळ आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रन्यासच्याच अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांकडून अशा प्रकारे जागा हडपल्या आहेत. अनेक जागांची परस्पर विक्री करण्यात आली आहे तर काही जागा आरक्षित असतानाही भूखंड मालकाने त्या विकल्याने तेथे सध्या पक्की घरे बांधली गेली आहेत हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान, जिल्हाधिकारी व प्रन्यासचे प्रभारी सभापती सचिन कुर्वे, मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, कार्यकारी अधिकारी संदीप बापट, कार्यकारी अभियंता देवेंद्र गौर यांच्या प्रयत्नामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.