22 April 2019

News Flash

नासुप्र लेआऊट हस्तांतरणाबाबत संभ्रम कायम

अधिकारी म्हणतात अद्याप काहीही नाही

दरबारात समस्या मांडताना नागरिक.

पालकमंत्री म्हणतात प्रक्रिया पूर्ण, अधिकारी म्हणतात अद्याप काहीही नाही; लक्ष्मीनगर विभागामधील जनता दरबारातील चित्र

नागपूर सुधार प्रन्यासचे सर्व लेआऊट महापालिकेला हस्तांतरित केल्याचे एकीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ठासून सांगत असताना अधिकारी दुसरीकडे मात्र, असे काहीही झाले नाही, असे सांगून हे आमचे काम नाही, महापालिकेचे आहे, असे उत्तर नासुप्रचे अधिकारी देत असल्याचे चित्र सोमवारी लक्ष्मीनगर झोनच्या जनता दरबारात दिसून आले.

वर्धा मार्गावरील विवेकानंद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी जनता दरबार झाला. महापौर नंदा जिचकार यावेळी उपस्थित होत्या. यावेळी बहुतांश तक्रारी नागपूर सुधार प्रन्यासशी संबंधित होत्या, तसेच अनेक वस्त्यांमध्ये स्वच्छता होत नसल्याचे आणि मलवाहिन्या तुंबल्याने दरुगधी पसरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. नासुप्रने अतिक्रमण नियमित केले आणि काही लेआऊटमध्ये मंजूर नकाशातील रस्ते गायब केल्याच्या तक्रारी देखील आल्या. यातून पुन्हा एकदा नासुप्रच्या कार्यपद्धतीमुळे नागपूरकर त्रस्त असल्याचे दिसून आले. याच त्रासमुळे नासुप्रला बरखास्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता, परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी झाली नाही.

नासुप्रच्या कारभारामुळे लेआऊटमधील रस्त्यांवर बांधकाम झालेल्या ठिकाणी नासुप्रने आरएल वितरित केले. हे प्रकरण आजच्या दरबारात गाजले. परफेक्ट सोसाटीमधील सावजी हटवार यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या सोसायटीला लागून दुबे लेआऊट आहे. नासुप्रने या लेआऊटला मंजुरी दिली आणि परफेक्ट सोसायटीचा रस्ता गायब केला. परफेक्ट सोसायटीने रस्त्यावर बांधकाम केल्याचे नासुप्रचे कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर यांनी दावा केला, तर हटवार यांनी सिटी सव्‍‌र्हेकडून मोजणी करून घेतली आहे. नकाशा मंजूर असून त्यात ३० फुटाचा रस्ता आहे. नकाशात रस्ता आहे तर मोका तपासणीत रस्ता का नाही, असा सवाल केला. त्यावर अधिकाऱ्यांकडे  काही उत्तर नव्हते. अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संवाद ऐकून हतबलतेने बावनकुळे यांनी नासुप्रने सत्यनाश करून ठेवला, असे म्हटले. परफेक्ट सोसायटीसाठी रस्ता आणि मलवाहिनी टाकण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची सूचना त्यांनी  केली.

काही प्रकरणांचा निकाल लावण्यासाठी १८ फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

मोकाट कुत्र्यामुळे झोप उडाली

कानफाडेनगरात कुत्र्यांचा हैदास आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची झोपमोड होत आहे, अशी तक्रार वामन दमके यांनी केली. कुत्र्यांच्या त्रासाबद्दल अनेकदा त्यांनी महापालिकेत तक्रार दिली. परंतु कुत्र्यांच्या संख्येत उलट वाढच झाली, असे दमके म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांची विनंती

भाजप कार्यकर्त्यांचे सर्व कागदपत्रे भाजप कार्यालयात हरवले. त्यामुळे त्याला गेल्या तीन वर्षांपासून आधार कार्ड तयार करता आले नाही. या कार्यकर्त्यांने याबाबत अनेक ठिकाणी तक्रार केली, परंतु यश आले नाही. त्याने आज फिर्याद मांडली. आपण खूप कार्यकर्ता आहे. कागदपत्रे हरवले आहे, आधार कार्ड बनवून द्यावे, अशी विनंती जनता दरबारात केली.

हस्तांतरण प्रक्रिया सुरू

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  म्हणतात, नासुप्रकडून सर्व अभिन्यास महापालिकडे हस्तांतरित झाले. अत्रे लेआऊटमधील मैदानावरील अतिक्रमणाच्या मुद्यांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, परंतु प्रत्यक्षात लेआऊट हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी लोकसत्ताला दिली.

First Published on February 12, 2019 2:41 am

Web Title: nagpur improvement trust 2