News Flash

नागपुरात आता फॅविपिरावीर औषधाचा तुटवडा

नागपुरात करोना स्थिती हाताबाहेर असून रोज सहा हजारांहून अधिक नवीन करोनाग्रस्त व ६० ते ७५ मृत्यूही नोंदवले जात आहेत.

|| महेश बोकडे

मेडिकलचा साठा संपल्याने चिंतेत भर

नागपूर :  शासकीय रुग्णालयांत रेमडेसिविर इंजेक्शन जवळपास संपले असतानाच आता औषध दुकानांत फॅविपिरावीर औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. या औषधांसाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक विविध औषधालयांत डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन पायपीट करत आहेत. दुसरीकडे मेडिकल रुग्णालयात हे औषध संपल्याने चिंतेत  भर पडली आहे.

नागपुरात करोना स्थिती हाताबाहेर असून रोज सहा हजारांहून अधिक नवीन करोनाग्रस्त व ६० ते ७५ मृत्यूही नोंदवले जात आहेत. १६ एप्रिलला शहरात ६३ हजारांवर सक्रिय करोनाग्रस्त होते. त्यातील गंभीर संवर्गातील ७ हजार ८८५ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरला उपचार सुरू आहेत. नवीन रुग्णांमध्येही ऑक्सिजनची पातळी खालावलेले व एचआरसीटीचा गुणांक अधिक असलेल्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. नवीन रुग्णांपैकी जोखमेतील वृद्ध, सहआजार असलेल्या व्यक्तींसह जास्त त्रास असलेल्या अनेक रुग्णांना डॉक्टर परिस्थितीनुसार फॅविपिरावीर  हे औषध घेण्याचा सल्ला देतात.

नागपुरात ग्लेनमार्क, सनफार्मा, मॅकलॉड्ससह विविध १० ते १२ कंपन्यांकडून फॅविपिरावीरच्या औषधांचा पुरवठा होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून अचानक नागपूरसह राज्यातील इतरही भागात रुग्ण वाढल्याने या औषधांचा वापर वाढला.  दुसरीकडे नागपुरात या कंपन्यांकडून कमी औषधांचा पुरवठा झाला. त्यामुळे फॅविपिरावीर औषधांचा तुटवडा आहे. जिल्ह्यातील अनेक नावाजलेल्या औषध दुकानातून हे औषध बेपत्ता असून करोनाग्रस्त रुग्णांसह त्यांचे नातेवाईक ती मिळवण्यासाठी शहरातील विविध औषधालयात पायपीट करतांना दिसतात. त्यामुळे लक्षणे असलेल्या करोनाग्रस्तांमुळे  आणखी संक्रमण वाढण्याचाही धोका  आहे. मेडिकलमध्ये फॅविपिरावीर  हे औषध संपल्याने  मेयो रुग्णालयाला उसनवारीवर औषध मागितले.  मेयोकडे ३० हजार गोळ्यांचा साठा होता. त्यातील ५ हजार गोळ्या मेडिकलला उशिरा उपलब्ध केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु हा साठा रुग्णांच्या तुलनेत कमी असून आता मेडिकल, मेयोत बाह््यरुग्ण विभागात येणाऱ्या गंभीर रुग्णांना हे औषध उपलब्ध करणे बंद झाले आहे.

मेडिकल, मेयोत अतिदक्षता विभागातील रुग्णांनाच रेमडेसिविर

मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत आहेत. दोन्ही रुग्णालयांत सध्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा संपला आहे. त्यामुळे रोज काही प्रमाणात मिळणाऱ्या इंजेक्शनमधून प्रथम  अत्यवस्थ रुग्णांना त्यानंतर  गरज असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देत आहेत. त्यानंतर शिल्लक राहिल्यास ते इतरांना दिले जाते.

अधिकारी काय म्हणतात?

रेमडेसिविर आणि फॅविपिरावीर इंजेक्शनच्या विषयावर मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे म्हणाले, औषधांचा विषय माझ्याशी संबंधित नसून त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्हाला बोलावे लागेल. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरी शनिवारी बहुतांश गंभीर रुग्णांना ते मिळेल तेथून उपलब्ध करून दिले गेले. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नवीन साठा मिळेल. फॅविपिरावीर औषध मेयोकडून उपलब्ध झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, जिल्ह्यात सध्या फॅविपिरावीरच्या सुमारे १४ हजार ५०० गोळयांचा साठा असून आणखी साठा रात्रीपर्यंत येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:38 am

Web Title: nagpur is now short favipiravir medicine akp 94
Next Stories
1 अहवाल मांडण्यासाठीची बैठकच रद्द
2 मृत्यूची पंचाहत्तरी!
3 कॅब चालकाकडून गतिमंद मुलीवर बलात्कार
Just Now!
X