21 January 2021

News Flash

कुठल्याही प्रचारतंत्राशिवाय नागपूरमधील ‘दिवे’ जगभरात

कर्नाटक, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतूनही मागणी

(संग्रहित छायाचित्र)

शिक्षणामुळे प्रगतीच्या वाटा अधिक रुंद होतात, हे जरी खरे असले तरी एक अशिक्षित व्यक्तीही इच्छाशक्तीच्या बळावर त्याच्या आवडत्या व्यावसायिक क्षेत्रात भरारी घेऊ शकते. नागपूरलगतच्या व्याहाडपेठ या गावातील मोतीराम खंदारे या गृहस्थाने हे सिद्ध केले आहे. ते तयार करीत असलेल्या मातीच्या दिव्यांना महाराष्ट्रात सर्वदूर, परराज्यात आणि विदेशातही प्रचंड मागणी आहे. ना कुठले मार्केटिंग, ना बाजारात विक्री दालन, ना नाममुद्रा, आधुनिक जगात व्यापारासाठी आवश्यक असलेल्या अशा कोणत्याही पर्यायांचा वापर न करता ते दरवर्षी लक्षावधी रुपयांची उलाढाल करतात. केवळ दिवाळीच्या दिवसात त्यांची ‘दिवे’विक्री ही सहा ते सात लाखांच्या घरात असते.

त्यांनी तयार केलेले दिवे फक्त नागपुरातच नव्हे, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आणि दुबई व ऑस्ट्रेलियातही जातात. मोतीराम यांना त्यांचा मुलगा प्रमोदही आता या कामात मदत करतो. स्पर्धेच्या काळात हे यश कसे मिळवले असे त्यांना विचारले असता त्यांनी याचे सर्व श्रेय वडील मोतीराम यांना दिले. पूर्वी आम्ही चाकावर मातीची पारंपरिक भांडी तयार करीत होतो. हळूहळू वडिलांनी नवनवीन प्रकारचे दिवे तयार करायला सुरुवात केली. ते आकर्षक दिसत असल्याने त्याचा गावात खप वाढला. चर्चा झाल्याने नागपूरचे लोक गावात येऊन  खरेदी करू लागले. आता आम्ही ६० ते ७० प्रकारचे दिवे तयार करतो. पण बाजारात विक्रीसाठी नेत नाही. घरीच येऊन लोक घेऊन जातात. ‘कलश’, ‘कासव’, ‘शंख’, ‘नारळ’ आणि ‘मॅजिक दिवा’ आदी दिव्यांना प्रचंड मागणी आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया येथेही ते पाठवले जातात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतूनही मागणी आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरसह इतरही जिल्ह्य़ांतून मागणी येते. इतक्या मोठय़ा प्रमाणात आलेल्या मागणीचा पुरवठा करायचा असल्याने वर्षभर काम पुरते.

केंद्र सरकारने नागपुरात स्वदेशी मेळावा आयोजित केला होता. त्यात आम्ही सहभागी झालो होतो. या मेळाव्यात एकाच दिवशी ५० हजार ‘मॅजिक दिवे’ विकले गेले. तेथून या दिव्यांची ख्याती दिल्लीपर्यंत गेली. तेथील प्रगती मैदानावर आयोजित आणखी एका मेळाव्याचे आमंत्रण केंद्र सरकारकडून आले. तेथे तीनच दिवसात सर्व दिवे विकले, असे प्रमोद खंदारे यांनी सांगितले.

हस्तकौशल्याची दखल

मोतीराम यांच्या हस्तकौशल्याची दखल दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रानेही घेतली. त्यांना केंद्राने भोपाळच्या कार्यशाळेत सहभागी करून घेतले. तेथे त्यांनी ‘मॉडर्न आर्ट’चा वापर करीत तयार केलेल्या मूर्ती आणि वस्तू सर्वाना पसंत पडल्या. काही वर्षांनंतर त्यांनी विदेशातून आलेल्या मूर्तिकारांनाही प्रशिक्षण दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:16 am

Web Title: nagpur lamps all over the world without any propaganda abn 97
टॅग Diwali
Next Stories
1 विदर्भातील नद्यांचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नाशिकला
2 राज्यातील शैक्षणिक आरक्षणाचे गणित बिघडले!
3 करोना काळात भाजपकडून आतषबाजीचा अतिरेक!
Just Now!
X