मुख्यालयाकडे अद्याप प्रस्ताव  नाही

मध्य भारतातील युवकांना वायुदलाकडे आकर्षित करण्यासाठी वायुसेना दिनाच्या निमित्ताने दर दोन-तीन वर्षांनी नागपुरात ‘एअर शो’ आणि ‘स्ट्रेटेजिक डिस्प्ले’ करण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. नागपुरातील वायुदलाच्या मेंटनन्स कमांडकडून मुख्यालयाकडे अद्याप प्रस्ताव सादर झाला नसल्याची माहिती आहे.

वायु दलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय नागपुरात आहे. शिवाय सोनेगाव येथे एअरफोर्स स्टेशन असल्याने वायुदलासाठी हे शहर महत्त्वाचे आहे. हे ध्यानात घेऊन मध्य भारतातील युवकांना वायुदलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने  ८ ऑक्टोबर या वायुदलाचा स्थापना दिनी  येथे एअर शो  यासारखे उपक्रम घेतले जातात. दिल्लीतील मुख्यालयात एअर शो दरवर्षी ठरलेला असतो व इतर ठिकाणी वेगवेगळ्या वर्षांत घेतला जातो. त्यानुसार  नागपुरातही दर दोन ते तीन वर्षांनी हा शो होत होता. २०१३ आणि २०१५ ला येथे एअर शो  झाले. त्यानंतर हा शो गेल्यावर्षी होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु ऐनवेळी  रद्द करण्यात आला होता. यावर्षी नागपूरचा दावा आहे. मात्र, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी हा ‘शो’ होणायाची शक्यताही मावळताना दिसत आहे, असे वायुदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली मुख्यालयात दरवर्षी एअर शो होतो, इतर ठिकाणी होईल की नाही निश्चित नसते. यावर्षीचा कार्यक्रम देखील आलेला नाही. मुख्यालयाकडे विनंती करण्यात आली काय, असे विचारले असता विनंतीने एअर मिळत नसतो. रोटेशन पद्धतीने शोसाठी शहराची निवड केली जाते. असे त्यांनी स्पष्ट केले. एअर शो करणारी चमू हैदराबादला असल्याने दिल्लीकडे जाण्यापूर्वी किंवा तिकडून येताना नागपुरात सादरीकर करण्याचे नियोजन केले जाते. ही चमू दिल्लीतील मुख्य कार्यक्रमाआधी सरावासाठी दिल्लीला जात असते. त्यानुसार नागपुरातील शोचे अनेकदा नियोजन झाले आहे.

चित्तथरारक हवाई कसरती 

हवाई दलाच्या ताफ्यातून  ‘सूर्यकिरण’ हे विमान बाहेर गेल्यानंतर ‘सारंग’ या हेलिकॉप्टरद्वारे हवाई कसरती केल्या जात आहेत. हवाई दलाच्या एअर शो सोबत ‘एअर फोर्स बँड आणि आकाशगंगा स्कायडायव्हिंग चमू सादरीकरण केले जाते. यात हवाई कसरती सोबतच विविध विमानांचे फ्लाई पास्ट आणि हेलिकॉप्टर बघावयास मिळतात. त्यामुळे शहरात एक वेगळे वातावरण निर्माण होते. यातून बऱ्याच युवकांना वायुदल आणि लष्कराबद्दल जिज्ञासा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

एका विशिष्ट कालावधीत देशात वेगवेगळ्या ठिकाणी ‘एअर शो’ घेणे अशक्य आहे. त्यामुळे दरवर्षी रोटेशनने ‘एअर शो’चे ठिकाणी दिल्ली मुख्यालयातून निश्चित केले जाते. यावर्षी दिल्ली वगळता कुठल्याच कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

– ग्रुप कॅप्टन बी.बी. पांडे, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण मंत्रालय.