विलगीकरण केंद्रातील गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये रोष

नागपूर : विलगीकरण केंद्रामध्ये गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमार्फत नगरसेवकांकडे केल्या जातात. मात्र कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्याची माहिती कोणत्याही लोकप्रतिनिधीला नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सूचना देऊन बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या उपवैद्यकीय अधिकारी

डॉ. प्रवीण गंटावार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

विलगीकरण केंद्राचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विलगीकरणात असलेल्या नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीच्या तक्रारी थेट लोकप्रतिनिधींकडे केल्या जातात मात्र, त्यांना कोणतीही माहिती राहत नसल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विलगीकरण कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव व त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौरांनी दिले. करोनाच्या कामात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून कुठलीही माहिती दिली जात नाही. आयुक्तांसह अधिकारी पदाधिकाऱ्याचे फोन उचलत नाही, यामुळे त्यांनी बैठकीत महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

एकही करोनाग्रस्त गंभीर नाही

शहरात ११ मार्चपासून आजपर्यंत ४१४ करोना रुग्ण असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३७ पूर्णपणे बरे झालेत व सद्यस्थितीत ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये  एकही रुग्ण नाही. सद्यस्थितीत शहरातील लक्ष्मीनगर झोन वगळता इतर नऊही झोनमध्ये करोनाग्रस्त आहेत. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी महापालिकेतर्फे आठ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. यातील आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ३३०, रवी भवन ३८, वनामती ३०, सिम्बॉयसिस ३७८, पाचपावली पोलीस क्वार्टर ४२३, लॉ कॉलेज वसतिगृह ८, व्हीएनआयटी ३६५, आरपीटीएस ५३ अशा सर्व विलगीकरण कक्षात एकूण १६२५ जणांना विलगीकरणात करण्यात आले आहे. या आठही विलगीकरण कक्षातील व्यवस्थेसाठी मनपातर्फे आठ व्यक्तींकडे जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचीही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली.

आयुक्त फिरकलेच नाहीत

महापौर संदीप जोशी यांनी  घेतलेल्या या बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यांना तसे पत्र देण्यात आले होते मात्र त्यांनी महापालिकेत असतानाही बैठकीकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे करोना विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या सात दिवसांत पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करा, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

पाणी समस्येवर झोन पातळीवर आढावा

शहरात मुबलक पाणी साठा असूनही अनेक भागात अल्पवेळ पुरवठा होत आहे तर काही भागात कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे पुरेशे पाणी मिळत नाही. शहरातील अनेक भागात ही समस्या आहे. त्यामुळे  जलप्रदाय समिती सभापतींच्या अध्यक्षतेत प्रत्येक झोनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी व त्याचा अहवाल तयार करून तो सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.