अधिकाऱ्यांची झाडाझडती 

नागपूर :  स्मार्ट सिटी संदर्भात सहा महिन्यात घेतलेल्या कुठल्याही निर्णयाची माहिती न देण्यावरून महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधला. आतापर्यंतचे निर्णय व कामाची कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. दोन दिवसापूर्वी स्मार्ट सिटीतील सहा कर्मचाऱ्यांना संचालकांना विश्वासात न घेता आयुक्तांनी सेवामुक्त केले होते. महापौरांनी आयुक्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड  (एनएसएससीडीसीएल) च्या कार्याची गुरुवारी महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी ‘इन कॅमेरा’ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला स्मार्ट सिटीचे संचालक स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीचे निर्णय किंवा केलेल्या कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र सहा महिन्यांपासून संचालक मंडळाला माहिती देण्यात आली नाही. याचा आढावा घेताना महापौरांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे बैठकीचे व्हिडीओ रेकर्डिंग करण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या त्या सहा कर्मचाऱ्यांना कुठल्या कारणावरून काढले याची माहिती संचालकासमोर सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शहराच्या विकासासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना केलेली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार होत असेल आणि परस्पर निर्णय घेतल्यास खपवून घेणार नसल्याचे महापौर म्हणाले. महापालिको बदनाम होऊ नये म्हणून नियमानुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणेच सर्वाची वागणूक असावी, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली. यावेळी एनएसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे,  महाव्यवस्थापक  (मोबिलिटी)  राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकुर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे,

ई—गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी बैठकीला उपस्थित होते.