शहरातील स्वच्छतेसंदर्भात असलेली अनियमितता, सफाई कर्मचारी आणि ऐवजदारावर अधिकाऱ्यांचा नसलेला वचक बघता सत्ता आणि विरोधकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून नाराजी व्यक्त केली. याबाबत सभागृहात विविध पक्ष सदस्यांनी व्यक्त केलेली नाराजी, जनतेच्या तक्रारी आणि विभागाची नकारात्मकता बघता आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी सभागृहात दिले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सदस्य सुरेश जग्यासी यांनी मंगळवारी झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केल्यावर सत्ता आणि विरोधी सदस्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी आणि प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची मनमानी आणि त्यांची काम करण्याबाबतच्या नकारात्मकतेवर नाराजी व्यक्त केली. सुरेश जग्यासी यांच्यासह शिवसेनेच्या अलका दलाल, आभा पांडे, काँग्रेसचे दीपक कापसे, प्रशांत धवड, राष्ट्रवादीचे राजू नागुलवार, प्रशांत धवड आदी सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यावेळी सुरेश जग्यासी म्हणाले, मंगळवारी झोनमध्ये ६०० सफाई कर्मचारी आणि ऐवजदारांची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र १०० कर्मचारीच कामावर असतात. अशीच परिस्थिती अनेक प्रभागात असून या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही. अनेक सफाई कर्मचारी सकाळी हजेरी लावून निघून जातात. मात्र, पालिकेकडून मोठय़ा प्रमाणात वेतन घेतले जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. दीपक कापसे यांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली. प्रभागात कोटय़वधीचा खर्च करून घेतलेली फॉगिंग मशिन झोनमध्ये धुळखात पडली असताना ती आरोग्य विभागाकडून दुरुस्त केली जात नाही. त्या संदर्भात अनेकदा विभागाला कळविले आहे. आरोग्य अधिकारी डॉ. गणवीर कुठल्याच प्रभागात जात नाहीत. मोबाईलवर आरोग्य विभागाचा ग्रुप तयार केला असून त्यावर संबंधित झोन अधिकाऱ्यांकडून घरी बसूनच माहिती घेतात, असा आरोप करण्यात आला. शहराचा विस्तार आणि लोकसंख्येचा विचार केला तर मोठय़ा प्रमाणात सफाई आणि ऐवजदार असताना शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष कसे होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. कचरा उचलण्याचे कंत्राट ज्या कनक कंपनीला देण्यात आले आहे त्या कंपनीवर आरोग्य विभागाचा वचक नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात येईल. प्रत्येक प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांची नोंद ठेवत जे कर्मचारी स्वाक्षरी करून निघून जातात आणि कामावर राहत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना कामावरून कमी करण्यात येईल.

सभागृहातील सर्व सदस्यांचा शहरातील अस्वच्छतेबाबत असलेल्या तक्रारी, आरोग्य विभागाची असलेली नकारात्मकता आणि नाराजी बघता आयुक्तांनी संदर्भात सदस्यांच्या तक्राराची गंभीर दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
-प्रवीण दटके, महापौर