महापौरांचा आयुक्तांना सवाल

नागपूर : गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी विविध विषयांची चौकशी करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पंधरा दिवस होऊनही प्रशासनाकडून एकाही विषयासंदर्भात उत्तर मिळाले नसल्याने हा सभागृहाचा अपमान असल्याचे सांगत महापौर संदीप जोशी यांनी  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र दिले आहे. त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात शेवटच्या दिवशी महापौरांनी  विविध विषयासंबंधी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर लावण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात यावा, केटी नगरमधील दवाखाना व इतर पाच दवाखाने बाबत स्थायी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून त्याचा अहवाल ठेवण्यात यावा, चेंबर दुरुस्ती व त्यावर झालेल्या खर्चाबाबत मुख्य अभियंत्याची एक सदस्यीय समिती स्थापन करून १५ दिवसात निर्णय घ्यावा, प्रमोद हिवसे हा काही दिवसांपूर्वी चालक होता, त्याला बढती कशी देण्यात आली, त्या आक्षेपाबाबत चौकशीचा अहवाल, जाफरी रुग्णालय संदर्भात डॉ. सवाई यांनी केलेल्या चौकशीबाबतचा अहवाल, एलईडी पथदिव्याची नस्ती १३५ दिवस स्वत:जवळ ठेवलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करून मूळ विभागात पाठवण्याबाबत, डॉ. प्रवीण गंटावार व शीलू गंटावार यांच्या गैरव्यवहाराबाबत त्यांचे तत्काळ निलंबन करून स्थायी समिती अध्यक्ष समितीच्या अध्यक्षतेत चौकशी करण्याबाबत, अधिकाऱ्यांनी स्थायी समितीची मंजुरी न घेता सुटीवर जाणे या विषयांचा समावेश होता. मात्र गेल्या पंधरा दिवसात प्रशासनाकडून एकाही निर्देशाचे उत्तर व संबंधित अहवाल  महापौर कार्यालयाला मिळाला नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात दिलेल्या निर्देशांबाबतचा अहवाल महापौर कार्यालयाच्या पटलावर ठेवावा, असे पत्र  महापौरांनी आयुक्तांना दिले आहे.

टाळेबंदीची वेळ येऊ  देऊ  नका 

शहरात पुन्हा टाळेबंदी लावायची की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा प्रशासनाला टाळेबंदी घोषित करावी लागेल. त्यामुळे करोनाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा.  टाळेबंदी पुन्हा लावण्याची वेळ येऊ  देऊ  नका, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले. जोशी यांनी आज बुधवारी महाल, गांधीबाग व इतवारी या बाजारपेठ असलेल्या भागात दौरा केला. यावेळी सर्वच ठिकाणी त्यांना गर्दी असल्याचे आढळून आले. काही दुकानदार स्वत:च मुखपट्टी लावलेले नव्हते. अशा सर्व दुकानांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंड ठोठावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी आमदार गिरीश व्यास, दयाशंकर तिवारी उपस्थित होते.