बर्डी उड्डाण पुलावरून दोन दिशेने मार्ग

मेट्रो रेल्वेचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी सध्या सुरू असलेल्या मार्ग बांधणीच्या कामामुळे मेट्रोचा भविष्यातील प्रवास कसा असेल या विषयी आराखडे बांधणे सुरू झाले आहे. दोन ठिकाणी मेट्रोचा मार्ग हा भारतीय रेल्वेच्यावरून असणार आहे तर मिहानमध्ये कॉनकर डेपोजवळ मेट्रो ही रेल्वेला समांतर धावेल. बर्डी उड्डाण पूल दोन वेळा मेट्रो ओलांडेल. वर्धा मार्गावर तिचा प्रवास काही किलोमीटर जमिनीवरचा, नंतर सिमेंट खांबावरचा असेल.

८६८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता आकार घेऊ लागला आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पाचे काम सुरू झाले होते सध्या मार्ग बांधणीचे काम ३० टक्क्यांवर आले आहे. खापरी ते नवीन विमानतळ या दरम्यानचा जमिनीवरूनच्या मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. या मार्गावरून सर्वात प्रथम मेट्रो धावेल आणि त्यानंतर टप्प्या टप्प्याने ती बर्डीपर्यंत पोहोचणार आहे.

मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर नजर टाकली तर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर मेट्रोतून होणारा प्रवास कसा असेल याचे प्राथमिक स्वरूपाचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. दोन ठिकाणी मेट्रो ही भारतीय रेल्वेचा मार्ग ओलांडून धावेल. त्यात कडबी चौक आणि बर्डीतील शासकीय टेक्निकल स्कूलजवळील मार्गाचा समावेश आहे. उंच सिमेट खांब तयार करून तेथे मेट्रोसाठी मार्ग तयार केला जाणार आहे. मिहानमधील कॉनकॉरजवळ ही मेट्रो भारतीय रेल्वेच्या रुळानजिकहून धावेल. रेल्वेस्थानकाजवळी रामझुल्याजवळही असेच चित्र पाहायला मिळेल. वर्धामार्गावरील छत्रपती चौकातील उड्डाण पूल पाडल्यानंतर तेथे पूर्वी पेक्षा मोठा उड्डाण पूल प्रस्तावित आहे. त्याच प्रमाणे मनीषनगर रेल्वे फाटकाजवळ आणखी एक पूल बांधण्यात  येणार असून तो वर्धामार्गावरील उड्डाण पुलाला येऊन मिळणार आहे. या पुलाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झाली नाही. मात्र, दोन वर्षांत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेट्रो रेल्वेला सहकार्य करणार आहे.

बर्डीवरील मेट्रोचे दृश्य विलोभनीय असेल. मुंजे चौकातील जंक्शनमधून निघालेला एक मार्ग हिंगण्याकडे तर दुसरा कस्तुरचंद पार्ककडे जाणारा असेल आणि हे दोन्ही मार्ग सध्यास्थितीत असलेल्या बर्डी उड्डाण पुलावरून जाणारे आहेत. झिरोमाईल स्टेशन हे मेट्रो जंक्शन इतकेच भव्यदिव्य राहणार आहे.

तेथे प्रवाशांसाठी हेरिटेज फूटवॉक तयार करण्यात येणार आहे. मेट्रोसाठी नागपुरातच डब्बे निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, चाचणीसाठी लागणारे डब्बे हैदराबाद मेट्रोकडून आणले जातील व नंतर ते परत केले जातील, असे मेट्रो प्रकल्प व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.