डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पोहोचणार

नागपुरात धावणारी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो ट्रेन’ चीनमधील कारखान्यात तयार करण्यात आली असून तेथून ती भारतात जलमार्गाने आणली जाणार आहे. गुरुवारी चीनच्या कारखान्यात महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दोन गाडय़ा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. चीनमधील सीआरआरसी, डालियन कारखान्यातून ब्रजेश दीक्षित यांनी नागपूरच्या पत्रकारांशी संवाद साधला यावेळी संचालक (रोलिंग एंड स्टॉक) सुनील माथुर उपस्थित होते.

पहिल्या फेरीत तीन बोगीच्या दोन गाडय़ा जलमार्गाने चेन्नईत येणार असून तेथून पुढे ट्रकने  डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात नागपुरात येण्याची शक्यता आहे. नागपूर मेट्रो रेल्वेच्या नियोजनानुसार  येथे २३ गाडय़ांची म्हणजे एकूण ६९ बोगींची आवश्यकता आहे. हे सर्व चीनमध्येच तयार करण्यात येणार आहे. चीनमधून भारतात येणारी मेट्रो गाडी अत्याधुनिक असून सर्व २३ गाडय़ा जुलैपर्यंत नागपूरला येतील, असेही दीक्षित यांनी सांगितले.

जनक कुमार गर्ग म्हणाले की, एक बोगीची किंमत ८.२ कोटी असून ती देशात सर्वात कमी आहे. बोगीमध्ये तीन हजार सुटे भाग लागले असून त्यात काही भारतात निर्मित करण्यात आलेआहेत. गाडीचे डिझाईन जर्मनीचे असून विद्युत उपकरण जोडणीचे तंत्रज्ञान भारतीय आहे. चीनमध्ये निर्मित डब्यांची रचना नागपूरला डोळ्यापुढे ठेवून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेवर अधिक लक्ष देण्यात आले असून खिडक्या अन्य गाडय़ांच्या तुलनेत मोठय़ा आहेत.

पुणे मेट्रोसाठी सिंदीला कारखाना

नागपूर मेट्रो रेल्वेसाठी थेट चीनहून बोगी आणल्या जात असल्या तरी पुणे मेट्रोसाठी लागणारे डबे महामेट्रो व्यवस्थापन त्यांच्या नागपूर नजिकच्या सिंदी रेल्वेजवळ उभारण्यात येणाऱ्या कारखान्यात तयार करणार आहे. या प्रकल्पाची तीन टप्प्यात उभारणी होणार असून पहिला टप्पा ३०० कोटीचा आहे. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे मेट्रोसाठी १०२ बोगींची गरज भासणार आहे. यापैकी ७५ टक्के बोगी महामेट्रो तयार करणार आहे. हा प्रकल्प जेएनपीटी ड्रायपोर्टच्या बाजूला असेल.जेनपीटीने या प्रकल्पात भागीदार व्हावे, अशी महामेट्रोची इच्छा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे मेट्रोचे कार्यकारी प्रबंधक ( रोलिंग एंड स्टॉक) जनक कुमार गर्ग यांनी सांगितले.