‘वेळेत कामे पूर्ण केली तरच मेट्रो रेल्वे प्रकल्प फायद्यात राहील’ हा मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी दिलेला संदेश मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाने प्रत्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी पावले उचलली आहेत.

मेट्रो रेल्वेच्या पहिल्या स्थापनादिनाच्या निमित्ताने मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन यांना निमंत्रित करण्यात आले होते. मेट्रोरेल्वे उभारणीतील श्रीधरन यांचा अनुभव हा या क्षेत्रात प्रमाण मानला जातो. त्यांनी नागपूर मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करीत हा प्रक ल्प आर्थिकदृष्टय़ा सक्षम करायचा असेल तर सर्व कामे वेळेत पूर्ण करा, असा सल्ला दिला होता. नागपूरच्या प्रकल्पाला एका दिवसाचा विलंब हा पन्नास लाखांचा फटका देणारा ठरू शकतो, या कडेही त्यांनी लक्ष वेधले होते. ही बाब ‘टिम मेट्रो’ ने गांभीर्याने घेतल्याचे सध्या तरी विविध पातळीवर सुरु असलेल्या कामाच्या निमित्ताने दिसून येत आहे.

कामासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार ते होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणे यासाठी एक स्वतंत्र व पारदर्शी यंत्रणा काम करीत असल्याचे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क)  एस. एम.आपटे यांनी सांगितले. उत्तर-दक्षिण (१७ किमी) आणि पूर्व-पश्चिम (१९ किमी) असा एकूण ३६ किमीचा मेट्रोचा प्रवास असणार आहे. याच्या कामाला सुरुवातही झाली आहे, वर्धा मार्गावर कामाची गती अधिक असून तेथे येत्या काही दिवसातच मेट्रोचा पहिला खांब उभारण्यात येणार आहे.जमीन अधिग्रहाणाच्या अवघड पातळीवरही मेट्रो प्रकल्पाची बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. एकूण लागणाऱ्या ८७.४ हेक्टर पैकी ६७ हेक्टर म्हणजे सरासरी ७७ टक्के जमीन प्रकल्पाकडे प्राप्त झाली आहे. एकूण ८,६८० कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाला पहिल्या वर्षी शासनाकडून ५०० कोटी रुपये मिळाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६००  कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. डॉ. श्रीधरन यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कंत्राटदाराच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले होते. काम वेळेत पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे ते म्हणाले होते, याचेही भान ‘टीम मेट्रो’ने मेट्रोभवनाच्या निर्मितीच्या निमित्ताने बाळगले आहेत. मेट्रो कार्यालयात लावण्यात आलेले विविध कामाच्या प्रगतीचे दिवसानिहाय वेळापत्रक मेट्रोने श्रीधनर यांचा सल्ला गांभीर्याने घेतल्याचे प्रतीक आहे.

‘मेट्रोभवन’चे काम अंतिम टप्प्यात

मिहान व हिंगण्यात डेपोचे काम सुरू आहे. सीताबर्डी रेल्वेस्थानकावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो जंक्शनच्या इमारतीसाठी जागतिक पातळीवर निविदा बोलवण्यात आल्या असून, लवकरच त्या अंतिम करण्यात येणार आहे. काचीपुऱ्यातील ‘मेट्रोभवन’चे काम अंतिम टप्प्यात आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित यांनी अलीकडेच चीन दौरा केला असून, तेथील ‘कोच’ नागपूर मेट्रोसाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे.