कामांमुळे होणाऱ्या गैरसोयींमुळे लोकसंताप; मेट्रोच्या तातडीच्या बैठकीत आढावा

बांधकामस्थळी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याचा दावा महामेट्रोकडून वारंवार केला जात असला तरी बर्डीवरील घटनेने या दाव्यातील फोलपणा आणखी एकदा पुढे आला आहे. ‘आजचा त्रास, उद्याचा आनंद’ असे फलक मेट्रोने त्यांच्या बांधकामस्थळी लावले असले तरी बांधकामामुळे होणारा त्रास आता नकोसा झाल्याची प्रतिक्रिया बर्डीत शुक्रवारी संतप्त नागरिक देत होते. दरम्यान, मेट्रोच्या अधिकाऱ्यांची आज तातडीने बैठक झाली व त्यात सुरक्षा उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.

सीताबर्डीतील मुंजे चौकात बांधकामस्थळी सिमेंट पिल्लरसाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सापळा शुक्रवारी अचानक कोसळला. या घटनेमुळे वित्त, जीवित हानी झाली नसली तरी मेट्रोच्या सुरक्षा उपाय योजनेतला फोलपणा मात्र पुढे आला. वर्दळीच्या ठिकाणी भरचौकात रस्त्यावर हे बांधकाम करताना आवश्यक त्या उपाययोजना करणे अपेक्षित होते. हा सांगाडा लोकांच्या अंगावर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र केवळ लोखंडी कठडे लावण्यापुरतीच मेट्रोची सुरक्षा उपायोजना आहे. बांधकामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने होणाऱ्या गैरसोयीमुळे या भागातील नागरिक कमालीचे नाराज आहेत. त्यात कालच्या घटनेने आगीत तेल ओतले गेले. वर्धा मार्ग, हिंगणा मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू आणि इतरही मेट्रो बाधकामस्थळी यापूर्वी अपघात झाले आहेत. वर्धा मार्गावरील वाहतूक वर्षभरापासून कोंडीत आहे. फक्त कठडे लावणे म्हणजे सुरक्षा उपाय करणे आहे काय? असा संतप्त सवाल बर्डीत राहणारे भूषण झळके यांनी केला. वर्धा मार्गावर मुळातच अरुंद झालेल्या रस्त्यावर मेट्रोचे १६-१८ चाकी महाकाय ट्रक उभे राहतात. सध्या जामठय़ात क्रिकेट सामना सुरू आहे. तो संपल्यावर शहरात येणारी वाहतूक सोमलवाडा ते छत्रपती चौक या दरम्यान कोंडीत सापडते. तास-तास भर वाहने अडकून पडतात. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांनाही याचा फटका बसतो. मात्र संपूर्ण शहरच आपल्याला आंदण दिल्यागत मेट्रो कंत्राटदाराचे वागणे लोकसंतापासाठी कारणीभूत ठरले आहे.

बर्डी ते हिंगणा मार्गावरील बांधकामामुळेही नागरिकांना त्रास होत आहे. या भागाचे आमदार सुधाकर देशमुख यांनी खुद्द ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नाही. बांधकामावरील सुरक्षा फक्त तेथील कामगारांसाठीच नव्हे तर तेथून जाणाऱ्या नागरिकांसाठीही हवी, अशी मागणी नागरिकांची आहे.

पुढील आठवडय़ात तपासणी मोहीम

बर्डीतील घटनेमुळे आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली व त्यात बांधकामस्थळावरील सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून, अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पुढील आठवडय़ात सुरक्षा तपासणी मोहीम मेट्रोकडून हाती घेण्यात येणार आहे. बर्डीच्या घटनेचे चौकशीचे आदेश शुक्रवारीच दीक्षित यांनी दिले होते. दुर्घटनेसाठी कंत्राटदारांना जबाबदार ठरवून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात येणार आहे.