28 September 2020

News Flash

मेट्रोचा वेग वाढला, पण प्रवाशांचा ओघ कमीच

३० किलोमीटर वेगाने धावणारी मेट्रो सहा महिने ‘पर्यटन गाडी’च ठरली.

नागपूर : ‘माझी मेट्रो’ चे कुतूहल सुरुवातीला शहरातील प्रत्येकच नागरिकाला होते. नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा ती प्रत्यक्ष धावायला लागली, तेव्हा नागरिकांनी त्यातून प्रवास करून कुतूहल शमवले. ३० किलोमीटर वेगाने धावणारी मेट्रो सहा महिने ‘पर्यटन गाडी’च ठरली. मेट्रो ताशी ८० किलोमीटर वेगाने धावल्यानंतरही अपेक्षेप्रमाणे प्रवाशांचा ओघा वाढत नसल्याचे चित्र प्रवासादरम्यान दिसून आले.

खापरी ते सीताबर्डीदरम्यान मेट्रोची ११ स्थानके आहेत. त्यापैकी केवळ सहा स्थानके सुरू आहेत. मार्च २०१९ मध्ये खापरीवरून मेट्रो सुरू झाली तेव्हा अवघी चार स्थानके सुरू होती. त्यातील दोन स्थानकांवर प्रवाशांना पोहोचणे हेच मोठे दिव्य होते आणि अजूनही ते आहे. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये जयप्रकाशनगर स्थानक सुरू झाल्यावर ताशी ३० किमी वेगाने जाणारी मेट्रो ताशी ८० च्या वेगाने धावू लागली. यानंतर खऱ्या अर्थाने मेट्रोला प्रवासी मिळाले. मेट्रोच्या तीनही डब्यात विखुरलेले प्रवासी पाहिल्यानंतर काही क्षण मेट्रो पूर्ण क्षमतेने धावल्याचा भास होतो, पण या तीन डब्यातील प्रवाशांची संख्या मोजली तर ती एक डबा भरेल एवढेच प्रवासी होतात. एक मात्र खरे की प्रवास करणारे हे पर्यटक नाही तर प्रत्यक्षात प्रवासीच आहेत.

सकाळी आठ वाजेपासून मेट्रो सुरू होते. पण दुपारी १२ पर्यंत यात प्रवासी असून नसल्यासारखे असतात. त्यानंतर मात्र प्रवाशांची रीघ फार नसली तरीही दुपारच्या टप्प्यानंतर ती वाढते आणि सायंकाळी पाच ते सातच्या टप्प्यात ती तुलनेने अधिक असते. जयप्रकाशनगरचे स्थानक सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मेट्रोला प्रवासी मिळाले आहेत. जयप्रकाशनगर स्थानक हे मनीषनगर परिसरातील व जयप्रकाशनगर, खामला भागातील लोकांसाठी सोयीचे ठरले आहे. खापरी ते सीताबर्डीदरम्यानची उर्वरित स्थानके सुरू झाल्यानंतर प्रवासी वाढतील, अशी अपेक्षा आहे.

विशेषकरून छत्रपती स्थानक हे प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे. सीताबर्डी स्थानक मध्ये असल्याने बर्डीवर येणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोयीचे आहे. जयप्रकाशनगर ते सीतबर्डीच्या प्रवासादरम्यान ही बाब लक्षात येत होती. ऑटोचा प्रवास म्हणजे महागडा आणि ऑटोचालकांची मनमानी, शहर बसचा प्रवास म्हणजे बर्डीपासून काही अंतरावरचा थांबा. तुलनेने मेट्रोचा सीताबर्डी थांबा अधिक सोयीचा असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. खड्डय़ातून, वर्दळीतून आणि कोंडीतून शहर बसने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित असल्याचे यावेळी महिला प्रवाशांनी सांगितले.

प्रवासी वाढण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न

विदर्भातील पहिली मेट्रो नागपुरातून धावली. अत्युच्च दर्जा, वातानुकूलित असल्याने आरामदायक प्रवास आणि प्रत्येक डब्यात कॅमेरे असल्याने सुरक्षित प्रवास अशी मेट्रोची ओळख आहे. मात्र, स्थानकाअभावी तर काही ठिकाणी स्थानके असूनही त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुविधाजनक नसल्याने प्रवाशांचा अपेक्षेनुरूप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच शाळा, महाविद्यालय तसेच मिहान कंपन्यांमध्ये जाऊन मेट्रो व्यवस्थापनातील अधिकारी उद्बोधन करत आहेत. मेट्रो स्थनकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष बस सोडण्याची तयारीही व्यवस्थापनाने दर्शवली आहे. संपूर्ण स्थानके सुरू झाल्यानंतरच प्रवाशांचा खरा प्रतिसाद कळणार आहे.

अ‍ॅक्वा मार्गाचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर मेट्रोच्या बहुप्रतिक्षित लोकमान्य नगर ते सीताबर्डी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचे उद्घाटन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सांगितले. शिंदे यांनी मंगळवारी राज्याच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा मुंबईत आढावा घेतला. या बैठकीत नागपूर मेट्रोच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. मेट्रोच्या बर्डी ते लोकमान्य नगर या ११ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित उपस्थित होते.

सुरू न झालेली स्थानके

’ उज्ज्वलनगर

’ छत्रपती चौक

’ अजनी चौक

’ रहाटे कॉलनी

’ काँग्रेसनगर

तीन स्थानकांच्या अडचणी

’ मेट्रोच्या खापरी स्थानकाची अडचण म्हणजे हे स्थानक आणि स्थानकाचा मार्ग सहजासहजी प्रवाशांना दिसत नाही.

’ न्यू एअरपोर्ट स्थानक आणि मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताच अजून तयार नाही.

’ एअरपोर्ट साऊथ पॉईंट स्थानक रस्त्यालगत असले तरी याठिकाणी फारशी लोकवस्ती नाही.

खापरी ते सीताबर्डीदरम्यान येणारी स्थानके

’ खापरी

’ न्यू एअरपोर्ट

’ एअरपोर्ट साऊथ पॉईंट

’ उज्ज्वलनगर

’ जयप्रकाशनगर

’ छत्रपती चौक

’ अजनी चौक

’ रहाटे कॉलनी

’ काँग्रेसनगर

’ सीताबर्डी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 4:19 am

Web Title: nagpur metro speed 80 kilometers per hour but passengers response low zws 70
Next Stories
1 पोलिसांच्या ‘होम ड्रॉप’चा महिलांना सुखद अनुभव
2 मानव-वन्यजीवांतील संघर्ष रोखण्यात वनखाते अपयशी !
3 फेरमूल्यांकनातून विद्यापीठाकडे कोटय़वधींचा निधी
Just Now!
X