वर्षभर वाहतूक कोंडीचा त्रास

बर्डीवरील मुंजे चौकात उभारण्यात येणारे मेट्रो रेल्वेचे जंक्शन पाच मजली असणार असून तेथे दोन मजल्यावर मेट्रोचे फलाट असणार आहे. ही भव्य इमारत बांधण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असून यामुळे होणारी वाहतूक कोंडी किमान वर्षभर तरी चालणार आहे.

नागपूर मेट्रो रेल्वेचे प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बर्डीवरील जंक्शन ही मेट्रोच्या इमारतीतील प्रमुख इमारतींपैकी एक असून त्याचे डिझाईन फ्रेन्चची आर्किटेक्ट कंपनी ‘ईनिया’ने तयार केले आहे. आयएलएफएस या कंपनीकडे बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे पाच मजली जंक्शन असणार आहे. पहिल्या मजल्यावर तिकीट काऊंन्टर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो गाडय़ांसाठी फलाटाची व्यवस्था असेल. चौथ्या मजल्यावर ऑपरेशन सेंटर असेल. येथून गाडय़ांचे नियंत्रण होईल. येथून उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम या दिशेने येणाऱ्या गाडय़ा त्यांच्या वेगवेगळ्या दिशेने जातील.

इंग्रजीच्या ‘एल’ आकाराची ही इमारत असेल. यासाठी चोवीस तास काम सुरू राहील. पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. ही इमारत पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागणार असला तरी वाहतुकीची अडचण मात्र एक वर्षांनंतर दूर होईल.

चालू वर्षांत २७०० कोटींची गरज

मेट्रो रेल्वे प्रकल्पावर आतापर्यंत १५०० कोटी रुपये खर्च झाले असून २०१७-१८ या वर्षांत २७०० कोटी रुपयांची गरज भासणार आहे. केंद्र सरकारकडून १३७ कोटी व राज्य सरकारकडून १५० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. नागपूर सुधार प्रन्यासकडून ७८ तर महापालिकेकडून ७३ कोटी रुपये घेणे आहे. ही रक्कम या संस्थांनी दिली नाही तर राज्य सरकारकडून घेतली जाईल. विदेशी अर्थसहाय्य करणाऱ्या बँकाही गरजेनुसार आर्थिक मदत करीत आहे. प्रकल्पासाठी निधीची कुठलीही चणचण नाही, असे मेट्रो रेल्वेचे संचालक (अर्थ) सी. माथूर यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीवर उपाय

मुंजे चौकातील जंक्शनच्या बांधकामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. त्यासाठी या भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसला असून त्यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे. यासंदर्भात मेट्रोची भूमिका स्पष्ट करताना महेशकुमार म्हणाले की, मुंजे चौक ते आनंद टॉकीज या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी जाईल इतकी जागा सोडली जाईल. त्यामुळे ग्राहकांना त्या भागातील दुकानांमध्ये जाणे सोयीचे होईल. याशिवाय पार्किंगसाठी पटवर्धन मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एक रस्ता बंद असला तरी येत्या दहा दिवसात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे लावण्यात येणार असून दोन्ही बाजूला दोन मीटरचा रस्ता मोकळा सोडण्यात येणार आहे.

माहिती केंद्र

सीताबर्डी व परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल काही सूचना असेल तर त्यासाठी माहिती केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथे नागरिकांना सूचना देता येईल. त्या सूचनांचाही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी सांगितले. बर्डीत ट्राफिक गार्डची संख्याही वाढविण्यात येणार असून त्या भागातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.