News Flash

मिहानमध्ये ३० टक्केच कंपन्या कार्यरत

शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती.

  • सरकारची कबुली
  • प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन एक वर्षांत

मिहान प्रकल्प नागपूरसह विदर्भाचा भाग्यविधाता ठरणार, असे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एक दशकाहून अधिक काळ लोटल्यावरही येथे फक्त ३० टक्केच कंपन्या सुरू होऊ शकल्या, अशी कबुली आज शासनाच्यावतीने विधान परिषदेत देण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन, सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत दिले.

शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे, किती लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारकडून निवेदन करताना येरावार यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात लक्ष घातल्याने त्याला गती आल्याचा दावा केला. या प्रकल्पात ७१ कंपन्यांना जागा देण्यात आली असून त्यापैकी २१ कंपन्या (३० टक्के) कंपन्या सुरू केल्याची कबुली त्यांनी दिली. पाच कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे, तर उर्वरित ४५ कंपन्यांनी काम सुरू करावे म्हणून पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कंपन्यांनी जागा घेऊन उद्योग सुरू केले नाही, त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यातील काहींनी उद्योग सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या विनंतीवरून ठराविक मुदतीत बांधकाम करण्याच्या अटींवर चार वर्षांची मुदतवाढ देण्यात आली, असे येरावार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात तेल्हारा, दहेगाव, कलकुही, खापरी (रेल्वे) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खापरी नजीक करण्यात आले असून तेथील ८२४ पैकी ८०६ प्रकल्पग्रस्त नवीन जागेत स्थलांतरित झाले आहेत. शहरी भागातील शिवणगाव, जयताळा, भामटी व चिंचभुवन येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिंचभुवन गावठाण्यात करण्यात येणार असून एकूण १०९९ पैकी १०२७ पात्र प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसनाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण केले जाईल. या प्रकल्पात १०,४०० तरुणांना प्रत्यक्ष तर २० हजार ५०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे, असा दावा येरावार यांनी केला. राष्ट्रवादीचे सतीश टकले यांनी सेवाक्षेत्र विस्ताराचा मुद्दा मांडला.

मेट्रोऐवजी मिहानकडे लक्ष द्या – गजभिये

मिहान प्रकल्पग्रस्त आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन मुद्यांकडे राज्यसरकारचे दुर्लक्ष झाले आहे. विमानतळावरील दुसऱ्या धावपट्टीचे काम अद्याप सुरू झाले नाही. ते पूर्ण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने मिहान मल्टीमॉडेल कार्गोहबचा उद्देश पूर्ण होणार नाही. सरकारने नागपुरात मेट्रोऐवजी मिहान प्रकल्पाकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:43 am

Web Title: nagpur mihan project
Next Stories
1 पतंजलीच्या रोजगारनिर्मिती दाव्याचा आधार काय?
2 विनोद तावडे विरोधी पक्षातच बरे होते
3 विधान परिषदेत शाळांचा मुद्दा गाजला
Just Now!
X