करोना वाढत असतानाही नागरिक बेफिकीर; दुकानदारांचेही नियमांकडे दुर्लक्ष

नागपूर : शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. हा  बेजबाबदारपणाच पुन्हा टाळेबंदीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने महापालिका प्रशासनाकडून विविध विभागांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. उपद्रवी पथकाच्या माध्यमातून  दुकानदार व बाजारावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.  दुकानात येणारे ग्राहक आणि दुकानातील कर्मचारी नियमांचे पालन करत नसल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले आहे. अनेक लोक मुखपट्टी न घालता आम्हाला काही होत नाही असे सांगत पथकांतील कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. बुधवारी  अनेक दुकानातील कर्मचारी व नागरिक मुखपट्टीशिवाय दिसून आले. त्यामुळे दोघांवर कारवाई  करण्यात आली. इतवारी, नंदनवन, सक्करदरा, वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकूलपेठ बाजार, रामनगर परिसरातील काही दुकांनामधील कर्मचाऱ्यानी मुखपट्टी घातली नसल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी नियमांचे पालन केले नाही तर सम आणि विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवली जातील, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

करोनाचा  संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा टाळेबंदीला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

९० मंगल कार्यालयांची तपासणी

करोनाचा वाढता संसर्ग बघता मंगळवारी महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाकडून  ८ मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. बुधवारी दुसऱ्या दिवशी कारवाई झाली नाही. मात्र ९० मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करून येथे गर्दी होऊ नये अशी ताकीद देण्यात आली.  बुधवारी कोणत्याही सभागृहात लग्न समारंभ दिसले नाही.  सभागृह, मंगल कार्यालये, लॉन इ. कार्यक्रम स्थळी व्यवस्थापकाने करोना नियमांचे उल्लंघन केले, मुखपट्टी व सॅनिटायझरचा वापर केला नाही, गर्दी जमवली तर दंड आकारण्यात येणार आहे.