नागपूर : घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आस्थेने विचारपूस करून कर्तव्य बजावताना स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शहरात सर्वेक्षणातून माहिती गोळा केली जात आहे. दररोज सकाळी आयसोलेशन रुग्णालयातून आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी निघतात.

करोनाविरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने मुंढे यांनी सोमवारी सर्वेक्षणाला निघण्याच्या वेळेवर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. समोर अचानक आयुक्त मुंढे यांना बघून सर्वेसाठी निघणारे व इतर कर्मचारी अवाक् झाले. मुंढे यांनी बसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

आपल्याला आपला जीव धोक्यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी. एका आसनावर एकाच महिलेने बसावे तसेच निर्देशांचे पालन करण्यास त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला. घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहनही केले.

रेशन दुकानात सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन

मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचे त्यांना दिसले.  सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याने तेथे पोहोचून सर्वाना तीन-तीन फुटांवर उभे केले आणि सामाजिक अंतराचे पालन करण्यास सांगितले. यावेळी लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रेशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटांवर खुणा करण्यास त्यांनी सांगितले.