खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्तांचा इशारा; संकटकाळातही जबाबदारी झटकत असल्याने कठोर निर्णय

नागपूर :  महापालिकेने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा  करोना रुग्णांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी संबंधित रुग्णालयांनी महापालिकेला  सूचना देण्याचेसुद्धा आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक खासगी रुग्णालयांना पत्र दिले तरी अजूनही ४० पेक्षा अधिक रुग्णालय करोना रुग्णांना दाखल करून घेत नाही. शिवाय आर्थिक लुटीच्या तक्रारी वाढतच आहेत. संकटकाळातही खासगी रुग्णालयांकडून सहाकार्य मिळत नसल्याने महापालिका प्रशासन कठोर झाले असून नियमांचे पालन झाले नाही तर आता थेट परवानाच रद्द करू, असा निर्वाणीचा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

आयुक्तांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, खासगी रुग्णालयांना ८० टक्के खाटा करोना सकारात्मक रुग्णांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे.   दाखल रुग्णांची माहिती, रिक्त खाटांची संख्या महापालिकेला कळवणे गरजेचे आहे. शहरात  ६३७ खासगी रुग्णालय आहेत, पण करोना रुग्णांसाठी फारच कमी रुग्णालय समोर येत आहेत. ३५ रुग्णालयात करोना केंद्र सुरू केले असून त्या ठिकाणी रुग्णांना देणाऱ्या वाढत्या देयकांच्या तक्रारी बघता प्रत्येक रुग्णालयात अंकेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. शासकीय नियमानुसार जे शुल्क असेल त्यापेक्षा जास्त  देयके दिल्याची तक्रार येताच अशा रुग्णालयांना दंड करून जास्तीची रक्कम त्यांच्याकडून परत घेतली जाणार आहे.

प्रत्येक खासगी रुग्णालयाच्या बाहेर  किती खाटा उपलब्ध आहे आणि शासकीय दर किती आहे, याबाबतचे फलक  लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयात लावण्यात येणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महापालिकेच्या पाच रुग्णालयांपैकी इंदिरा गांधी, आयसोलेशन या रुग्णालयात खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या ठिकाणी खाटांची संख्या वाढवली आहे.

आणखी एका उत्पादन शुल्क निरीक्षकाचा मृत्यू

नागपूर उत्पादन शुल्क विभागातील  निरीक्षक  मुरलीधर मंडपे यांचे करोनामुळे निधन झाले. करोनामुळे मृत्यू होणारे या विभागाचे ते दुसरे निरीक्षक आहेत. यापूर्वी  रावसाहेब कोरे यांचा मृत्यू झाला होता. मंडपे यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना  सेंटर पॉईंट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. सध्या या विभागात करोनाची दहशत आहे.

बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाई

झोन पातळीवर नियंत्रण कक्षात रुग्णवाहिकेसह इतर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे आता प्रत्येक झोनमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दररोज झोनपातळीवर आढावा घेत  नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिली जात नसेल तर संबधित अधिकारी व  कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील. सध्या  रुग्णालयाची संख्या बघता ६० मेिट्रक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची कमी नाही मात्र १० मेिट्रक टन ऑक्सिजन क्षमता वाढवणार आहे, त्यासाठी भिलाईमधील प्लान्टमध्ये संपर्क साधला असून तेही लवकरच  उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

आणखी ४० खासगी रुग्णालये करोना केअर केंद्र

यापूर्वी ६२ खासगी रुग्णालयांना ‘डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल’म्हणून घोषित करण्यात आले होते. यामध्ये आता आणखी ४० रुग्णालयांची भर पडली आहे. आता शहरात एकूण १०२ खासगी रुग्णालयांमध्ये करोनाचे उपचार केले जाणार आहेत. रुग्णहिताच्या दृष्टीने  हा महत्त्वपूर्ण निर्णय असून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.

ऑक्सिजन तुटवडा जाणवल्यास नियंत्रण समितीकडे संपर्क  साधा

नागपूर जिल्ह्य़ातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये करोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर जिल्ह्य़ात  जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.  निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालयाचे परिवहन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य आहेत. तर सदस्य सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन नागपूर या विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. जिल्ह्य़ातील सर्व रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे उत्पादक, ऑक्सिजन निर्मिती कारखाने, ऑक्सिजन पुरवठादार,या सर्वांशी ही समिती समन्वय ठेवणार आहे.  पुरवठय़ा संदर्भात कुठलीही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन  नियंत्रण कक्षाला  (७१२-२५६२६६८) या क्रमांकावर संपर्क साधतवा, असे कळवण्यात आले आहे.