नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणमध्ये काम करण्यासाठी  महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचे १५६ अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात येणार आहेत. या प्रस्तावालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, एनएमआरडीएच्या १५२९.८४ कोटींच्या अंदाजपत्रकास आज गुरुवारी अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंजुरी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेतील कामांची देयके प्राधिकरणाच्या निधीतून मंजूर कण्यास २५ कोटींची मर्यादा १०० कोटींपर्यंत वाढवण्यात आली. तसेच याच योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची ऑनलाईन सोडतीद्वारे विक्री करून वाटप करण्यासाठी घरकुलाचे आरक्षण धोरण ठरवण्याच्या प्रस्तावाला अध्यक्षांनी मान्यता दिली. तसेच फुटाळा तलाव, संगीत कारंजे, साऊंड व लेझर शो तसेच अंबाझरी लाईट, साऊंड व लेझर शोच्या खर्चास मान्यता देण्यात आली. एनएमआरडीएच्या लोगो निश्चित करण्याच्या प्रस्ताव मान्य करण्यात आला.

बुद्धिस्ट थिम पार्कला मान्यता

कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला शिखर समितीने मान्यता दिली. २१४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून एनएमआरडीएला नियुक्त करण्यात आले आहे. बुद्धिस्ट थिम पार्कसोबत कन्व्हेन्शन सेंटरही येथे उभारण्यात येणार आहे.