पूर्व नागपूर

महापालिकेच्या मतदानाला आता सात दिवस शिल्लक असल्याने प्रचार वेग घेऊ लागला आहे. उमेदवार ‘दारोदारी’ जाऊन मतदारांच्या थेट भेटीवर भर देत आहेत. या दरम्यान उमेदवारांना कुठे सन्मानाची वागणूक मिळते तर कुठे त्यांना सजग मतदारांकडून खडे बोलही ऐकून घ्यावे लागते.

सोमवार, वेळ दुपारी १२.३० वाजताची. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रभाग क्रमांक २१च्या उमेदवारांच्या लालगंज, खैरीपुरा परिसरातील प्रचाराचे दुसरे सत्र सुरू होणार होते. तेवढय़ात काही कार्यकर्त्यांनी आवाज दिला ‘बजाव रे’ आणि ढोल-ताशे वाजू लागले. ढोले-ताशे पुढे आणि चारही उमेदवार व पक्षाचे दहा-पंधरा कार्यकर्ते मागे. अशी प्रचार यात्रा सुरू होते.

ढोल-ताशांच्या आवाजामुळे लोक दार उघडतात, बाहेर येतात. गल्लीबोळातून एकेका दारासमोर जाऊन उमेदवार हात जोडून मत देण्याची विनंती करतात. कार्यकर्ते चार यंत्र, चार बटण, चार मते असे मतदान करावे, असे आवाहन करतात. लोकांना प्रचारपत्रक दिले जातात. लोकही ते शांतपणे घेतात आणि उमेदवाराची प्रचारयात्रा पुढे गेली की, पत्रके रस्त्यावर भिरकावून देतात. कार्यकर्ते दाराच्या शेजारील भिंतीवर प्रचारपत्रक चिटकवतात आणि त्यानंतर मोर्चा पुढील दाराकडे वळतो. त्या दारावर देखील याची पुनरावृत्ती होते, परंतु अपवाद ठरतो, एखादी व्यक्ती वृद्ध असेल किंवा प्रश्न विचारणारी असेल किंवा ओळखीची असेल तर!

ढोल-ताशांचा आवाज ऐकून एक आजीबाई बाहेर आल्या, तर उमेदवाराने आजीबाईला चक्क साष्टांग नमस्कार घातला. इतर तीनही उमेदवारांनी त्याचीच पुनरावृत्ती केली. आजीबाईने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर प्रचारयात्रा पुढे वळण घेत आणखी एका निमुळत्या बोळीत प्रवेश करते. अगदी खेटून असलेल्या घराच्या दारात एक-दोन महिला आणि पुरुष उभे असतात. उमेदवार हात जोडून मतदानासाठी विनंती करतात, परंतु यावेळी, समस्या सुटत नसल्याचा सूर एका दाराच्या मागून ऐकू येतो. एक पुरुष बोलू लागतो, घरोघरी नळ देण्याची योजना आहे.

अनेकदा नगरसेवकाला विनंती केली, परंतु नळ लागलेले नाहीत, अशी तक्रारवजा नाराजी व्यक्त करतो. त्यावर उमेदवाराचे उत्तर तयार होते. तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता? त्याने वर्तमानपत्राचे नाव सांगतातच, उमेदवार म्हणतो मी विविध समस्या मांडत असतो आणि त्याविषयीचे वृत्त देखील विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आहेत. मला मतदान करा, पहिले काम तुमचेच केले जाईल, असे सांगून प्रचारयात्रा पुढे निघते.

जुण्या जाणत्यांची आठवण

जुन्या वस्त्यांमध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची मदत घेतली जात आहे. या जुन्या, जाणत्या कार्यकर्त्यांंच्या शब्दाला ज्या वस्तीमध्ये वजन आहे, त्या भागात त्यांना सोबत घेऊन उमेदवार फिरू लागले आहे. तुमचे मत आम्हाला (उमेदवाराला) नव्हे तर या ‘काकां’ना (निष्ठावंत जुना कार्यकर्ता) मिळेल असे उमेदवार सांगू लागले आहे.

महिलांनी सुनावले

मतदार सजग झाल्याचे प्रचार पदयात्रेदरम्यान दिसून आले. उमेदवार कुठे हात जोडून तर कुठे पाया पडून मत पदरात टाकण्याची विनंती करीत असताना काही महिला मतदारांनी उमेदवारांना सुनावण्यास कमी केले नाही. निवडणूक आली की सर्वजण सेवा करण्याची संधी द्या, असे म्हणून पाया पडायला येतात, पण मतदान झाले की, कुणी इकडे ढुंकूनही पाहत नाही, अशा शब्दात लालगंज येथील एका महिलेने प्रभाग क्रमांक २१ मधील काँग्रेसच्या उमेदवाराला सुनावले.

सर्व एकाच माळ्याचे मणी

काँग्रेसच्या उमेदवारांना खैरीपुरा भागात प्रचार करताना लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. गेल्या दहा वर्षांत महापालिकेत आमची सत्ता नव्हती, असे सांगून उमेदवारांनी वेळ मारून नेली. शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू आहे, परंतु खैरीपुरा या पूर्व नागपुरातील जुन्या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे दिसून आले. उमेदवार एका घरातील कुटुंब प्रमुखांना मत देण्याची विनंती करून पुढील घराकडे वळत असताना त्या घरातील एका युवतीचा आवाज आला. अनेकदा सांगून आमच्या भागात विंधन विहीर (बोअरवेल) बांधण्यात आली नाही, ती युवती म्हणाली. त्यावर उमेदवाराने विंधन विहीर बांधली जाईल, काळजी करू नका, असे उत्तर देत पुढल्या घराकडे जाऊ लागले. सर्वचजण असेच सांगतात, असे प्रतिउत्तर त्या मुलीकडून आले आणि उमेदवाराला माघारी फिरावे लागले. उमेदवाराने एका कार्यकर्त्यांला तक्रारकर्त्यांचे नाव आणि वस्तीचे नाव नोंदवून घेण्याची सूचना केली. त्यावर बंडूजी खेडेकर यांनी तक्रार नोंदवून घेतली.

ई-रिक्षाने प्रचार

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक २१, २३, २४, २५, २६, २७ आणि ४ चा समावेश आहे. याशिवाय प्रभाग ५, २२ आणि २८ मध्ये प्रत्येकी ३० टक्के पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील वस्त्यांच्या समावेश आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसप, विदर्भ माझा यांच्यासह काँग्रेस आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. या भागात पायी प्रचार यात्रेबरोबर वाहनांवर भोंगे आणि होर्डिग बांधून गाण्याच्या चालीवर प्रचार केला जात आहे. यावर्षी पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणात ई-रिक्षाचा प्रचारासाठी वापर होत आहे.