महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पावसाळ्यापूवी शहरातील विविध भागात अतिक्रमण कारवाई सुरू केली असून त्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या झोपडपट्टी, छोटय़ा विक्रेत्यांवर व दुकानदारांवर कारवाई केली जात आहे, मात्र शहरातील विविध झोनमध्ये असलेले हॉटेल, मंगल कार्यालय आणि लॉन्सवर कारवाई न करता त्यांना महापालिका प्रशासनाकडून आणि राजकीय दबावामुळे अभय दिले जात आहे.
नागपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार बघता शहरातील विविध भागातील खुल्या भूखंडावर हॉटेल, लॉन आणि मंगल कार्यालये निर्माण करण्यात आले आहे, तरी त्यातील अनेक ठिकाणी नियमानुसार बांधकाम करण्यात आले नाही. काही ठिकाणी पार्किंग तर काही ठिकाणी पुरेशी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांच्या विरोधात कुठलीच कारवाई केली जात नाही. शहरात ७३५ हॉटेल्स, २१० मंगल कार्यालय आणि ११५ लॉन असून त्यातील अनेक लॉन आणि मंगल कार्यालय हे शहरातील बाजारपेठ असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम असला की लोकांना वाहने ठेवण्यासाठी जागा राहत नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात आणि त्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. शहरातील अनेक मंगल कार्यालयांचे बांधकाम करताना त्यांनी पार्किंगची सुविधा केली नाही. शिवाय काही मंगल कार्यालयांनी फुटपाथ पार्किंग केले असल्याचे समोर आले, अशा मंगल कार्यालयांवर मात्र महापालिकेकडून कुठलीच कारवाई केली जात नाही.
nag02नेहरूनगर झोनमध्ये ३४ मंगल कार्यालये, तर धंतोली झोनमध्ये १८१ हॉटेल्स आणि हनुमान नगर झोनमध्ये सर्वाधिक ३८ लॉन्स आहेत. नेहरूनगर झोनमध्ये असलेल्या ३४ मंगल कार्यालयापैकी १४ मंगल कार्यालये नंदनवन परिसरात वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याला लागून आहेत. त्या ठिकाणी बाजारपेठ आहे. त्यातील अनेक मंगल कार्यालयांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. धंतोली झोनमध्ये १८१ हॉटेल असून त्या अनेक हॉटेलमध्ये पार्किंगची सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी येणारे लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. शिवाय अनेक हॉटेल्सने अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. शहरातील लॉनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची अनियमितता आहे. मात्र त्यांच्यावर गेल्या तीन वर्षांत महापालिका प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही.
शहरातील विविध भागात फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला बसलेल्या छोटय़ा विक्रेत्यांवर गेल्या काही दिवसात कारवाई केली जात असताना या अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या मोठय़ा हॉटेल, लॉन आणि मंगल कार्यालयांवर का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न छोटय़ा विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. सीताबर्डीवरील छोटय़ा विक्रेत्यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देताना त्यांना हॉकर्स झोन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

पावसाळ्यापूर्वी शहरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू असताना शहरातील हॉटेल, मंगल कार्यालय आणि लॉन मालकांवर कारवाई केली जात आहे. त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक हॉटेलने अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता ज्या ठिकाणी नियमाच्या बाहेर जाऊन बांधकाम केले आहे त्यांना नोटीस देऊन ते बांधकाम पाडले जात आहे. यापुढे मंगल कार्यालय, लॉन किंवा हॉटेलचे बांधकाम करताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे आणि जे घेणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– सुधीर राऊत, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका.