पक्षाच्या बैठकीला अनुपस्थितीचा ठपका
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या काही दिवसात नगरसेवकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाही पक्षात बेशिस्त कायम आहे. पक्षाचे आदेश न पाळणे आणि पक्षाच्या बैठकीनाही अनुपस्थित राहणे या कारणावरून ४२ नगरसेवकांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यापूर्वी सर्व नगरसेवकांना राजीनामे मागितल्याने पक्षामध्ये असंतोष खदखदत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १५१ पैकी तब्बल १०८ जागा मिळवत भाजपाने सलग तिसऱ्यांदा निर्विवाद यश मिळवले. यश डोक्यात शिरल्याने पक्षात बेशिस्त वाढली, त्यातून नगरसेवकही सुटले नाहीत. नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाच्या प्रतिमेला तडे जात असल्याने पक्षाने दबावतंत्र म्हणून नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला. आता पक्षशिस्तीच्या नावाखाली ४२ नगरसेवकांना नोटीस बजावल्याने नगरसेवकामध्ये असंतोष निर्माण झाला. पक्षाच्या बैठकीचे किंवा कार्यक्रमांचे निमंत्रण पाठवूनही नगरसेवक त्याकडे पाठ फिरवतात. त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने ही नवीन खेळी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पक्षाने बजावलेल्या नोटीसीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून नगरसेवकांना पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे त्यांना लोकनाराजीला तोंड द्यावे लागते आणि दुसरीकडे पक्षातूनच अविश्वास दाखवून नोटीस बजावली जात आहे.
पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये रुसवे वाढले आहेत. विषय समितीचे सभापती बैठकी घेत नाही, सदस्यांना विश्वास घेत नाही त्यामुळे यापूर्वी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना बदलवण्याचे संकेत यापूर्वी सत्तापक्ष नेत्यांनी दिले होते. मनाप्रणाणे काम करता येत नाही, अशी प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार सूचना देऊन अनेक नगरसेवक बैठकीला किंवा कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. हा पक्षशिस्तीचा तो भंग आहे. अशा ४२ नगरसेवकांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा हा एक भाग आहे.
– संदीप जोशी, सत्तापक्ष नेता, भाजप, महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 2:48 am