अध्यक्षपदी संदीप जाधव

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पक्षाचे अनुभवी सदस्य आणि महापालिकेच्या कार्यशैलीचे जाणकार संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचा विकास करताना कुठे किती खर्च करावा आणि कुठे करू नये, या संदर्भात आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि त्यात महापालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये, यासाठी तिजोरीची किल्ली जाधव यांच्याकडे असली तरी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ११ महिला सदस्यांची मोठी फळी राहणार असून खर्चावर त्यांचे नियंत्रण राहणार आहे.

पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांनी १ मार्चला महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव यांच्या नावाची घोषणा केली. रविवारी महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर महापौर नंदा जिचकार यांनी स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात विविध राजकीय पक्षांकडून नावे मागविली. भाजपचे १२, काँग्रेसचे ३ आणि बसपच्या एका सदस्याचा समितीत समावेश करण्याचे निर्देश पालिका सचिवांनी दिले. त्याप्रमाणे भाजप आणि बसपकडून नावे देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांनी समितीच्या तीनही जागा तूर्तास रिक्त ठेवण्यास सांगितल्यामुळे महापौर नंदा जिचकार यांनी भाजप आणि बसप समिती सदस्यांच्या नावे जाहीर केली. भाजपकडून प्रथमच ११ महिलांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यात संगीता गिऱ्हे, रिता मुळे, उषा पॅलेट, बाली हत्तीठेले, भाग्यश्री कानतोडे, नेहा वाघमारे, सरला नायक, मनीषा कोठे, सरिता कावळे, लता काटगाये आणि जयश्री वाडीभस्मे यांची, तर बसपकडून जितेंद्र घोडेस्वार यांचे नाव जाहीर करण्यात आले.

महापालिकेत भाजपच्या १०८ पैकी ६१ महिला असल्यामुळे आणि महापौरपदी महिलाच असल्याने सर्व महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले. संदीप जाधव अनुभवी सदस्य असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती सदस्य खर्चाचे योग्य नियोजन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर जिचकार यांनी सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि संजय महाकाळकर यांची नावे विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर केले.

महिला सदस्यांची मते घेऊन नियोजन

गेल्या काही वर्षांत एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली तरी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा निधी आणि मालमत्ता, पाणी आणि अन्य कर वसुली करून महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यात येईल. शहरातील विकामकामे निधीअभावी थांबतील, अशी वेळ येणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास केला जात असून निधीची कमतरता जाणवणार नाही. शिवाय, कर्मचाऱ्यांचे वेतनही नियमित करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. समितीत ११ महिला सदस्य असल्याने त्यांची मते घेऊन नियोजन करू.

 संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष