गेल्यावर्षी २५ दशलक्ष घनलिटर पाण्याची उधळपट्टी

नागपूर : नागपूरची होळी जोरात असते. होळीत सर्वात जास्त उपयोग होतो तो पाण्याचा. गेल्यावर्षी होळीत नागपूरकरांनी तब्बल २५ दशलक्ष घनलिटर पाण्याची उधळपट्टी केली होती. यंदा नागपूरवर जलसंकट घोंगावत असताना होळीत पाण्याचा अपव्यय थांबवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी एकीकडे महापालिका पर्यावरणस्नेही होळीचे आवाहन करत असताना लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी काही थांबलेली नाही. अनेक मोठय़ा गृहसंकुलांमध्ये तसेच स्वीिमगपूल, पाण्याच्या टाकीची सोय असलेल्या ठिकाणी तर होळीचा उत्साह बॉलिवूडच्या चित्रपटांप्रमाणे असतो. आता हा ट्रेंड लहान बृहप्रकल्पांमध्येही दिसू लागला आहे. होळी आली की शंभर घरांच्या इमारतींच्या आवारातही खास रेन डान्सची सोय करण्यात येते. विशेष टँकर बोलावून टाक्या भरल्या जातात आणि सकाळी आठ वाजल्यापासून पाण्याची नासाडी सुरू होते. काही रिसॉर्ट आणि मोठय़ा हॉटेल्स्मध्येही असाच प्रकार घडतो. या पाश्र्वभूमीवर  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रमुख धरणात जलसाठा चांगलाच खालावला आहे. शिवाय भूजलपातळी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खाली गेली आहे.

लाखो लिटर पाण्याची नासाडी

रंग पाण्यात टाकून तयार करण्यासाठी एक व्यक्ती सुमारे दहा ते पंधरा लिटर पाणी वापरतो. म्हणजे पाच लाख लोक तब्बल ५० लाख लिटर पाणी केवळ होळीचा रंग खेळण्यासाठी वापरतात. त्यानंतर अंगावर पडलेला हा रंग काढण्यासाठी एका व्यक्तीला २० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता भासते. यासाठी पाच लाख लोकांना शंभर लाखाहून अधिक लिटर पाणी लागते. विशेष म्हणजे, होळीमध्ये जेवढे पाणी वाया घातले जाते तेवढेच पाणी होळीमुळे खराब होणारी वाहने धुण्यासाठी वापरले जाते. नागपूर शहरात एका व्यक्तीला  किमान ११० लिटर पाणी प्रत्येक दिवशी पुरवले जाते. त्यामुळे धुळवडीच्या निमित्ताने नागपूरकरांनी मागच्या वर्षी वाया घालवलेल्या २५ लशलक्ष घनलिटर पाण्यात किमान सात दिवस ३५ हजार लोकांची पाण्याची गरज भागवली जाऊ शकली असती.

होळीसाठी टँकरचा पुरवठा नाही

यंदा होळी खेळण्यासाठी कोणालाच टँकरचा पुरवठा करण्यात येणार नाही. होळीत मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. आम्ही दरवर्षी कोरडी होळी खेळण्याबाबत जनजागृती करत असतो. यंदाही करू. नागपूरकरांनीही आमच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.

– नंदा जिचकार, महापौर