महापालिकेचे करोना नियंत्रण ‘राम भरोसे’

नागपूर : प्रत्येक करोनाग्रस्तांच्या संपर्कातील २० लोकांची तपासणी करण्याचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात महापालिके चे पथक निम्म्याही लोकांपर्यंत पोहचत नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत पोहचतात ते चाचणी करण्यास टाळाटाळ करतात, असे विदारक चित्र करोना संसर्गवाढीच्या काळात शहरात दिसून येत आहे. दुसरीकडे गृहविलगीकरणातील बाधितांपर्यंत औषध पुरवठाही नीट होत नसल्याच्या तक्रारी  आहेत.

शहरात दररोज अडीच ते तीन हजार  रुग्ण सापडत आहेत. प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील २० लोकांची तपासणीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार दैनंदिन बाधितांची संख्या लक्षात घेतली तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या ही सरासरी  पन्नास हजार ते दीड लाखांवर जाते. प्रत्यक्षात महापालिकेची यंत्रणा रोज २० ते २५ हजार लोकांपर्यंतच पोहचत आहे. उर्वरित संशयित हे मोकळे फिरत आहेत.

करोनाचा उद्रेक लक्षात घेतला तर इतक्या मोठय़ा  प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेकडे  यंत्रणा नाही. सध्या सर्व झोन मिळून दोन सदस्यांचा समावेश असलेल्या १५० पथकांकडे हे काम आहे. कर्मचारी बाधितांचे कुटुंबीय व इमारत व परिसरातील इतर नागरिकांपर्यंतच पोहचू शकतात. इतरांशी ते दूरध्वनीवरून संपर्क साधतात व त्यांना चाचणी करण्याची विनंती करतात. यापैकी  ७० टक्के लोक ‘आम्हाला लक्षणे नाही’ असे सांगून चाचणी करण्यास टाळाटाळ करतात, असे महापालिकेच्या पथकातीलच कर्मचारी सांगतात. दरम्यान, बाधित कर्मचाऱ्यांपर्यंत औषध पोहोचवले जात  नाही, त्यांची विचारपूसही केली जात नाही. गृहविलगीकरणातील बाधितांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस होणे आवश्यक आहे. एकदा विचारल्यावर पुन्हा संपर्क साधला जात नाही, असा आरोप रुग्णांनी केला आहे. जास्तीत जास्त लोकांची चाचणी व्हावी म्हणून महापालिकेने फिरते तपासणी वाहन तयार केले आहे. यामुळे चाचण्या वाढल्या असल्या तरी बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यात यंत्रणा कमी पडत आहे.

रुग्णसंख्या वाढत असतानाच्या काळात महापालिकेची यंत्रणा प्रभावी पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र नाही. विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कामाचा ठसाही  अद्याप उमटलेला नाही. आपत्कालीन स्थितीत ज्या गतीने यंत्रणा हलायला हवी त्या गतीने ती हलत नाही, केवळ बैठका आणि निर्देश दिले जातात. अंमलबजावणीच्या पातळीवर बोंब आहे. सध्यातरी महापालिकेचे करोना नियंत्रण ‘राम भरोसे’ या पद्धतीने सुरू आहे.

खाटांच्या उपलब्धतेची एकत्रित माहिती द्या – डॉ. संजीव कुमार

नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात सध्या ५ हजार २८४ करोनाबाधित  शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यातील सर्वाधिक ३ हजार ८५६ रुग्ण नागपूर जिल्ह्य़ातील आहेत. जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या  जास्त असल्याने विविध रुग्णालयात भरती रुग्ण व रिक्त खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना दिल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही. त्यासाठी महापालिकेने कारवाई करावी. नागपूर जिल्ह्यत शासकीय रुग्णालयात  आयसीयू नसलेल्या एक हजार खाटा तसेच खासगी रुग्णालयात २ हजार ३६७ खाटा उपलब्ध आहेत. आयसीयूसह शासकीय रुग्णालयात ३८० तर खासगी रुग्णालयात ८१८ खाटा उपलब्ध असून यामध्ये शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त ९० खाटांची वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येनुसार खासगी रुग्णालयामध्येही खाटांच्या संख्येत वाढ करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी बुधवारच्या बैठकीत संबंधित विभागांना दिली.

तीनही विलगीकरण केंद्रात केवळ २४४ रुग्ण

शहरात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने निर्माण केलेल्या करोना केअर केंद्रात मात्र केवळ २४४   रुग्ण असून ६० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. शहरात विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असताना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या करोनाच्या रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात असतानाही महापालिकेच्या करोना केअर केंद्रात केवळ २४४ करोनाबाधित लोकांना ठेवण्यात आले आहे. त्यात पाचपावलीतील केंद्रात १६७, व्हीएनआयटीमध्ये ३८ आणि आमदार निवासात ३९  रुग्ण आहेत.

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहरात १५० पथक नियुक्त केले असून ते संबंधितांशी संपर्क साधून त्यांना लसीकरण करण्याबाबत सूचना करतात. बाधित वस्त्यांमधील जास्तीत जास्त नागरिकांना चाचण्या करता याव्या म्हणून फिरते चाचणी पथकही तयार करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बाधितांच्या घरावर स्टीकर लावण्यात येत नाही. मात्र पाचहून अधिक बाधित असतील तर तेथे प्रतिबंधिक क्षेत्र असा फलक लावला जातो.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध

दिनांक      बाधित     संपर्कातील व्यक्ती       

१७ मार्च   २९१३      २३ हजार ११२

१८ मार्च    २५२४    २९ हजार ६६४

१९ मार्च    २८२६     ३० हजार ५६४

२० मार्च    २६००    २७  हजार ५२३

२१ मार्च    २९७६     २८ हजार ५४२

२२ मार्च    २६२५     २६ हजार २३

२३ मार्च    २२७२     २७ हजार ३१