विदर्भात वर्धा नगरपालिका उत्कृष्ट

प्रकल्प व्यवस्थापनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्य शासनाने नागपूर महापालिकेला विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदा तसेच महापालिकांना विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात वर्धा नगरपरिषदेने ‘अ’ वर्गातील उत्कृष्ट नगरपरिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला. ‘ब’ वर्ग नगरपरिषदेतील नागपूर विभागातून प्रथम पुरस्कार उमरेड, द्वितीय पुरस्कार बल्लारपूर यांना प्राप्त झाला तर अमरावती विभागात प्रथम पुरस्कार वाशीम, द्वितीय उमरखेड नगरपालिकेला मिळाला. ‘क’ वर्ग नगर पालिकेत नागपूर विभागात मौदा नगर पंचायत प्रथम आणि खापा द्वितीय क्रमांकावर आहे.

अमराववती विभागात शेंदूरजनाघाट प्रथम आणि दारव्हा पालिकेला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ब’ वर्ग नगरपरिषदेतून सवरेत्कृष्ट पालिका म्हणून उमरेडला मान मिळाला आहे. याशिवाय विशेष पुरस्काराने अकोला नगरपरिषदेला सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे मिळाला आहे. उत्कृष्ट ‘अ’ वर्ग नगरपालिकांना प्रत्येक चार कोटी, ‘ब’ वर्ग नगरपालिकांना तीन कोटी आणि द्वितीय पुरस्कार प्राप्त पालिकांना दोन कोटी रुपये मिळणार आहे. ‘क’ वर्गातील प्रथम पुरस्कार प्राप्त नगरपरिषदेला दोन कोटी पन्नास लाख, द्वितीय पुरस्कारापोटी दोन कोटी रुपये मिळणार आहे.