महापालिकेची उदासीनता कारणीभूत

नागपूर : पर्यावरण ऱ्हासाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी महापालिकेने नागरिकांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ राखण्याचा संकल्प केला. मात्र, पालिका प्रशासनाची उदासीनता आता नागरिकांचे आरोग्य सुधारण्याऐवजी त्यांच्या आरोग्यावरच वाईट परिणाम करत आहे. पालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपवर शहरातील अस्वच्छतेच्या शेकडो तक्रारी अजूनही अदखलपात्रच ठरल्या आहेत.

स्वच्छता सर्वेक्षण अभियानाची सुरुवात झाल्यानंतर उपराजधानी देखील या स्पर्धेत उतरली. शहरातील अस्वच्छतेची ठिकाणे कळावी, अस्वच्छतेविषयीच्या तक्रारी थेट पालिकेपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचे त्वरित निराकरण करता यावे, याकरिता स्वच्छता अ‍ॅप तयार करण्यात आले. ऑगस्ट २०१६ ला हे ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून नागरिक त्यांच्या परिसरातील समस्या त्वरित नोंदवू शकतील आणि त्यांच्याच मदतीने पर्यावरण सुरक्षित राखता येईल, हा त्यामागील उद्देश होता. नागरिकांनीही पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि सुमारे ७३ हजार ५२२ नागरिकांनी हे ‘स्वच्छता अ‍ॅप’ त्यांच्या भ्रमणध्वनीत अंतर्भूत केले. सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींच्या निराकरणावर गांभीर्याने लक्ष दिले. मात्र, आता ही यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. अ‍ॅपवर दिलेल्या तक्रारींचे निराकरणच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने कचराघराची स्वच्छता न करणे, सार्वजनिक शौचालयात अस्वच्छता असणे, मोकळ्या जागेत कचरा जाळणे, नाल्या तुंबणे, मोकळ्या जागेत कचरा टाकणे, सार्वजनिक शौचालयात वीज व्यवस्था, खुल्या मलवाहिन्या, उघडय़ावरील शौच आदींचा समावेश आहे. सुरुवातीला महापालिकेनेच या समस्या १२ आणि २४ तासांच्या आत सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरुवातीच्या काळात झाली, पण त्यानंतर दोन-दोन महिने तक्रारी सोडवल्याच जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

प्रशासनाची संथगती

या अ‍ॅपच्या माध्यमातून २०१९ मध्ये एप्रिल महिन्यात १५२५ तक्रारी नोंदवण्यात आल्या. यातील  सुमारे १८८ तक्रारींचे निराकरण अजूनही झालेले नाही. मे महिन्यात १०५४ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यातील ३९१ तक्रारी अजूनही निराकरणाविना पडून आहेत. जूनच्या मध्यान्हापर्यंत २८८ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यातील २२६ तक्रारींचे निराकरण झालेले नाही.

स्वच्छता अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे निवारण २४ तासांच्या आत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही ते नियमितपणे करत आहोत. सध्याच्या स्थितीत केवळ दहा वगैरे तक्रारींचेच निवारण होणे बाकी आहे.

– डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी, महापालिका.