दुभाजकांची रंगरंगोटी, ब्लिंकर्स नसल्याने अपघातांना निमंत्रण

नागपूर : रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी असून रस्ते अपघात कमी करण्यावर विचारमंथन सुरू आहे. पण, प्रत्यक्षात अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश येत असून महापालिकेचे शहरातील देखभाल दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. शिवाय महामेट्रो आणि उड्डाणपुलांच्या बांधकामांमुळे अनेक रस्ते अरुंद झाली आहेत. ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्याची समस्या नागपूरकरांना आता नवीन नाही. पण, सुरक्षित वाहतुकीसाठी समतल रस्त्यांसह त्याच्यावर आवश्यक सूचना लावणे व अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडा व दुभाजक दिसेल, अशी व्यवस्था असायला हवी. दुभाजक काळ्या व पिवळया रंगाने रंगवण्यात यायला हवे, दुभाजकापासून ६ इंचीवर पिवळा किंवा पांढरे पट्टे लावायला हवेत, रस्त्याच्या मधोमध व रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाचे पट्टे असायला हवेत. त्याशिवाय राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर वळण घेण्यापूर्वी रिफ्लेक्टर बसवायला हवेत. दुभाजकांपासून ६ इंच दूर ब्लिंकर्स लाईट असायला हवेत. याकरिता महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) स्वतंत्र तरतूद आहे. पण, अनेक रस्त्यांवरील दुभाजक रंगवून वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात रस्ता दुभाजक दिसत नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक परिसर ते वाडी, अंतर्गत रिंगरोड परिसरातील रस्ता दुभाजक अनेक वर्षांपासून रंगवण्यात आले नाहीत किंवा त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्या अंधारात दुभाजक दिसत नसल्याने अनेक वाहने दुभाजकावर धडकून अपघात घडतात. शहराच्या परिसरातून जाणाऱ्या गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये ३ हजार ६५९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीही महत्त्वाची आहे.

साडेतीन हजार किमीचे रस्ते

महापालिकेच्या क्षेत्रात ३ हजार ४६५ किमीचे रस्ते आहेत. त्यापैकी २ हजार २०१.२९ किमीचे रस्ते महापालिका, २९.८० किमीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ११० किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नासुप्रकडे १ हजार १२४.४८ किमीचे रस्ते येतात. त्यामुळे प्रत्येक रस्त्याची देखभाल दुरुस्ती त्या-त्या यंत्रणांकडून होणे अपेक्षित आहे. सर्वाची जबाबदारी विभागली असल्याने काही रस्त्यांची देखभाल दुरुस्तीला विलंब झाला असेल. पण, रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना विभागांतर्फे करण्यात येतात.

– एम.एच. तालेवार, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग, महापालिका.

अडीच हजार कोटींची तरतूद

रस्ता सुरक्षा व आवश्यक देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडून वाहतूक विभागासाठी अडीच कोटीची तरतूद असते. गेल्यावर्षी तरतूद कमी होती. पण, रस्त्यांवर पट्टे लावणे, ब्लिंकर्स लाईट बसवणे, रिफ्लेक्टर आदी बसवण्याची कामे करण्यात येतात. सिमेंट रस्त्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याची तक्रार प्राप्त होत असून त्यासंदर्भात नवीन उपाययोजना करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. सिमेंट रस्त्यांवर पिवळ्या रंगाचे पट्टेही लावण्यात येऊ शकतात.

– ए.जी. बोदिले, कार्यकारी अभियंता, वाहतूक, महापालिका

रस्ता सुरक्षेसाठी देखभाल दुरुस्ती आवश्यक

रस्ता सुरक्षेसाठी दुभाजकांची वेळोवेळी रंगरंगोटी, रिफ्लेक्टर बसवणे, सूचनांचे फलक, पांढरे व पिवळे पट्टे लावणे आणि ब्लिंकर्स लाईट बसवण्यात यायला हवे. याकरिता विभागाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जातो. कोणत्या रस्त्यांवर अशा सुविधा नसतील तर त्या ठिकाणाचा प्रस्ताव तयार करून विभागाकडे सादर करण्यात यावा, ताबडतोब निधी उपलब्ध करून दिला जाईल.

– अनिरुद्ध मुकटे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग.