* अतिजोखीमेचे रुग्ण वाऱ्यावर * उपराजधानीत ४३ मृत्यूनंतरही प्रशासन ढिम्मच

अतिजोखीमेतील रुग्णांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस टोचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक महापालिकेला लस खरेदीच्या सूचना दिल्या, परंतु नागपूर महापालिकेकडून सातत्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात ‘स्वाइन फ्लू’चे ४३ बळी गेल्यावरही शासकीय रुग्णालयांत लसीकरण थांबले आहे. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या अशीच वाढल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्वाइन फ्लू संसर्गाचा सर्वाधिक धोका मधुमेह, रक्तदाब, गर्भवती महिला, हृदययरोग, मूत्रपिंड व फुफ्फुसाचा आजार असलेल्या अतिजोखीमेतील रुग्णांना असतो. राज्याच्या संसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाच्या तांत्रिक समितीने या रुग्णांना (इन्फ्लुएन्झा- ए, एच १ एन १) ही प्रतिबंधित लस टोचण्याची शिफारस केल्यामुळे जुलै २०१५ पासून राज्यातील शासकीय रुग्णालये व इतर एकूण २२४ केंद्रांवर हे लसीकरण सुरू करण्यात आले. शासकीय रुग्णालयांत गर्भवती महिला उपचाराकरिता आल्यास त्यांना ही लस टोचली जात होती, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून लसींच्या तुटवडय़ामुळे हे लसीकरण राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात थांबले आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे लसींचा तुटवडा असून त्यांना खरेदीत तांत्रिक अडचण येत असल्याने विलंब होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागपूर महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांना स्थानिक स्तरावर लसी खरेदी करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कोल्हापूर या महापालिकांनी लस खरेदी करून लसीकरण सुरू केले आहे, परंतु विदर्भात सर्वाधिक स्वाइन फ्लू रुग्ण आढळणाऱ्या नागपूर महापालिकेकडून अद्यापही या पत्राची साधी दखलही घेतली नाही.

नागपूर महापालिकेकडून गेल्या काही महिन्यात थोडय़ा प्रमाणात लस घेण्यात आल्या असल्या तरी त्या ५०० हून कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यातच केवळ डागा शासकीय स्मृती महिला रुग्णालय या एकाच रुग्णालयात वर्षांला सुमारे १५ हजार प्रसूती होतात. शहरात अतिजोखीमेतील रुग्णांचे लसीकरण थांबले असून येथे या संवर्गातील मृत्यू वाढल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूर शहरात १ जानेवारी २०१७ ते २६ ऑक्टोबपर्यंत स्वाइन फ्लूचे २९६ रुग्ण आढळले असून त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आजही काही रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असून मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

दाखल रुग्णांच्या उपचाराची सोय नाही

नागपूर महापालिकेच्या एकाही रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’ग्रस्त रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीनेही काही वर्षांपूर्वी महापालिकेची याबाबत कानउघाडणी केली होती.

सार्वजनिक आरोग्य विभागाने लसी द्याव्या

नागपूर महापालिकेच्या काही केंद्रांवर स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे, तर नव्याने ३७५ लस मागवण्यात आल्या आहे. महापालिका सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिजोखीमेतील रुग्णांसाठी महापालिकेला लस उपलब्ध करून द्यावी. सध्या अतिजोखीमेच्या रुग्णांना ही लस दिली जात आहे.

– डॉ. अनिल चिवाने, आरोग्य विभाग, नागपूर महापालिका